Chinchwad Crime News : व्यावसायिक भागीदाराची 19 लाखांची आर्थिक फसवणूक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – व्यावसायिक भागीदाराने दुस-या भागीदाराची 18 लाख 93 हजार 638 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक करणा-या भागीदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुभाष एकनाथ भेगडे (रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यात जमील छोटू खान (रा. खडकी पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुभाष भेगडे हे मागील अनेक वर्षांपासून ‘समर्थ क्रेन सर्व्हिसेस’ या कंपनीच्या माध्यमातून लोडींग, अनलोडींग, शिफ्टिंग वर्क्स, क्रेन सर्व्हिसेस आणि बूम लिफ्ट पुरविण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान भेगडे यांनी जमील छोटू खान यांच्याशी मिळून एकत्र व्यवसाय सुरु केला. खान यांची एम के एंटरप्रायजेस नावाची संस्था आहे. टाटा मोटर्स, जनरल मोटर्स या सारख्या कंपन्यांना भेगडे आणि खान हे क्रेन सेवा पुरवतात.

टाटा मोटर्स या कंपनीने विभा इंजिनिअर्सच्या माध्यमातून एक कंत्राट दिले. त्या कामाची हमी खान यांनी घेतली. 11 डिसेंबर 2016 ते 1 मार्च 2019 या कालावधीत क्रेन, बूम लिफ्ट्स इत्यादी साधने पुरवल्याबाबत विभा इंजिनिअर्स यांनी सर्व बिले खान यांना धनादेश आणि आरटीजीएस द्वारे दिली.

दरम्यान, खान यांच्याकडून भेगडे यांना 62 लाख तीन हजार 923 रुपये एवढे येणे होते. त्यातील 43 लाख 10 हजार 286 रुपये खान यांनी भेगडे यांना दिले. उर्वरित 15 लाख 28 हजार 507 आणि जीएसटी, मागील जीएसटी अशी एकूण 18 लाख 93 हजार 638 रुपये रक्कम देणे बाकी होते. त्या रकमेचा धनादेश खान यांनी दिला. मात्र तो बँकेत पैसे कमी असल्याने वटला नाही. खान यांनी केलेल्या समझोता करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग करत भेगडे यांची फसवणूक केली.

त्यामुळे जमील खान आणि श्रीकांत भगवानराव माने (रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भेगडे यांनी तक्रार अर्जातून केली आहे. खान आणि माने यांनी अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास संबंधितांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.