Andrew Symonds : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचा अपघाती मृत्यू 

एमपीसी न्यूज : एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्स याच्या कारला अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 46 वर्षीय सायमंड्सचा क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

शनिवारी रात्री टाउन्सविले परिसरापासून 50 किमी दूर हर्वे रेंज येथे रात्री साडे दहा वाजता एक भीषण अपघात झाला. वेगात असलेली एक गाडी रस्त्यावर पलटल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. याच गाडीत अँड्र्यू बसला होता. पोलिसांनी धाव घेत त्याला रुग्णालयात पोहोचवलं. तिथे त्याच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आले. मात्र, त्या उपचारांना अँड्र्यूने प्रतिसाद दिला नाही आणि त्याची प्राणज्योत मालवली.

अँड्र्यूच्या अपघाती निधनाने क्रिकेटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. याच वर्षी ऑस्ट्रेलियाने तीन दिग्गज क्रिकेटपटू गमावले आहेत. आधी रॉड मार्श, नंतर शेन वॉर्न आणि आता अँड्र्यू सायमंड्स असे तीन खेळाडू एका वर्षात निधन पावल्याने ऑस्ट्रेलियन किक्रेटप्रेमींमध्ये दुःखाचं वातावरण आहे. क्रिकेटच्या मैदानावर अँड्र्यू यांनी ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 12 टी-20 सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या 2003 आणि 2007 च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.