Chikhali Crime News : रस्त्यात पार्क केलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने मायलेकीस मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यात पार्क केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने तरुणीला बेदम मारहाण केली. त्यांनतर जखमी तरुणी हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना आरोपीने तरुणीच्या दुचाकीचा पाठलाग करून तिच्या दुचाकीला कट मारला. ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी कोयनानगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या घरासमोर राहतो. त्याने रस्त्यामध्ये पार्क केलेली गाडी काढण्यासाठी फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीला सांगितले. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला काठीने मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. आरोपी यांनी फिर्यादी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी आणि त्यांची मुलगी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेल्या. रुग्णालयातून घरी जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. फिर्यादी यांच्या दुचाकीला कट मारून आरोपी निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार शिर्के तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.