Pune News : चार महिन्याच्या मांजरीचा अचानक मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टनंतर शेजारील महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : चार महिन्याच्या मांजरीचा अचानक मृत्यू झाला. मांजरीच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती समोर आली. डोक्यात अवजड वस्तूचा वर्मी वार बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

शिल्पा निळकंठ शिर्के असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राण्यांना क्रुरतेने वागविण्याच्या अधिनियमानुसार या महिलेवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत दत्तात्रय गाठे (वय 53) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. गोखले नगर मध्ये 2 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी यांच्या घरात तीन ते चार महिने वयाचे मांजरीचे पिल्लू होते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात लगबग सुरू होती. फिर्यादीची पत्नी घराबाहेर रांगोळी काढत होती त्यामुळे दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजातून हे पिल्लू घराबाहेर पडले आणि थेट शेजारच्या घरात गेले. त्यानंतर काही वेळातच शिल्पा शिर्के या महिलेने हे पिल्लू असं का करते म्हणून शेजार्यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी घरात जाऊन पाहिले असता मांजरीचे पिल्लू तडफडत होते. त्यानंतर काही वेळातच त्याने प्राण सोडले.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी मांजरीच्या पिल्लाचे पोस्टमार्टम केले असता डोक्यात वर्मी वार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यानंतर शेजारील महिलेवर हातातील काठीने मांजराच्या डोक्यावर मारून त्याला ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुर्श्रुंगी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.