Chinchwad : गॅस गळती झाल्याने गॅस सिलेंडर घेतला पेट

एमपीसी न्यूज – गॅस गळती झाल्याने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत जेष्ठ नागरिकाने तो सिलिंडर मोकळ्या जागेत आणला. दरम्यान सिलेंडर घराबाहेर आणतानाआगीच्या झळा लागल्याने कारचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी सुदर्शननगर, चिंचवड येथे घडली.

चिंचवड परिसरातील सुदर्शननगर भागातील रहिवासी शिवाजी कृष्णाजी भोंडवे तूप तयार करण्यासाठी बंगल्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅसची शेगडी लायटरने पेटवित होते. त्यावेळी गॅसची अचानक गळती होवून सिलेंडरने पेट घेतला. पेट घेतलेला गॅस सिलेंडर भोंडवे यांनी तारेच्या आकडीच्या साह्याने बाहेर आणला. सिलेंडर बाहेर आणताना त्यांच्या कारचा मागील भाग जळाला.

भोंडवे यांनी पेटता सिलेंडर बाहेर आणून त्याच्यावर पाणी व वाळूचा मारा सुरू ठेवला. सिलेंडरने पेट घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्कूल बस चालक-मालक संघटनेचे बाबासाहेब भालदार यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सोरटे, शिवला झनकर, दत्ता रोकडे, विकास बोंगाळे, शाम इंगवले, पंकज येडके यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.