Chinchwad Crime News : ग्राहक बनून आलेल्या महिलांनी पु ना गाडगीळ, चंदूकाका सराफ दुकानातून पळवले दागिने

एमपीसी न्यूज – पु. ना. गाडगीळ आणि चंदूकाका सराफ या सराफी दुकानांमधून ग्राहक बनून आलेल्या महिलांनी सोन्याचे दागिने पळवले. चिंचवडगाव येथे पु ना गाडगीळ या दुकानात तर चाकण येथील चंदूकाका सराफ या दुकानात हे प्रकार उघडकीस आले आहेत.

मीनाक्षी अतुल दाभाडे (वय 49, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 25 ते 30 वयोगटातील अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीनाक्षी या चिंचवडगाव येथील पु ना गाडगीळ अँड सन्स या सराफी दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत एक अनोळखी महिला दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आली. तिने हातचलाखी करून दुकानातील ट्रे मधील 11.880 ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची शिव प्रतिज्ञा कोरलेली सोन्याची अंगठी चोरली. त्या अंगठीच्या जागी पांढरे खडे असलेली व बारकोड लावलेली नकली अंगठी ठेऊन निघून गेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

रणजित जगन्नाथ पवार (वय 48, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण मार्केटयार्ड परिसरात चंदूकाका सराफ हे सोन्याचे दुकान आहे. फिर्यादी या दुकानात काम करतात. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला दुकानात सोन्याची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आली. तिने सोन्याच्या अंगठ्याच्या डिस्प्ले फोल्डर मधून 7.190 ग्रॅम वजनाची 38 हजार 600 रुपये किमतीची अंगठी हातचलाखीने काढून घेतली. त्यानंतर डिस्प्लेच्या फोल्डरमध्ये दुसरी नकली अंगठी ठेवली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.