Blood Donate Camp : महारक्तदान शिबिरास भरभरून प्रतिसाद, 1,268 बाटल्या रक्त संकलित

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Blood Donate Camp) शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महारक्तदान शिबिराचे मतदारसंघात चाळीस ठिकाणी आयोजन केले होते. त्यात तीन हजार 496 बाटल्या रक्त जमा झाले. सर्वाधिक प्रतिसाद भोसरी विधानसभा मतदारसंघात मिळाला. तेथे एक हजार 268 बाटल्या रक्त संकलित झाले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हे शिबिर भरविण्यात आले होते. त्याची सुरवात स्वतः डॉ.खासदार कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे रक्तदान करून केली. नंतर दिवसभरात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर-आंबेगाव, हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघात हे शिबिर झाले. त्याला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच (तीन लाखांचा अपघाती खर्च वैद्यकीय विमा आणि जीवीत हानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये) देण्यात आले.तसेच त्याला आजीवन मोफत रक्तही दिले जाणार आहे. एवढेच नाही,तर त्याच्या नातेवाईकांनाही वर्षभर मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाने या रक्तदान शिबिरात जशी आघाडी मारली,तशीच ती भोसरीतीलच नेहरूनगर या रक्तदान केंद्रानेही मारली. शिरूरमधील 40 रक्तदान केंद्रापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल 373 बाटल्या रक्त नेहरूनगर (Blood Donate Camp) येथे संकलित केले गेले.

भोसरी (1272),जुन्नर (776), शिरूर (478),आंबेगाव (477),हडपसर (397) आणि खेड (97) असे या विधानसभा मतदारसंघनिहाय रक्तदान झाले. भोसरीतील रक्तदान यशस्वी होण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहूल भोसले, सरचिटणीस आणि प्रवक्ते विनायक रणसुंभे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, दिपक साकोरे, वसंत बोराटे आदींनी परिश्रम घेतले.खासदार डॉ. कोल्हे यांनी दिवसभरात अनेक रक्तदान केंद्रांना भेटी दिल्या.भोसरीतील मोशी आणि इंद्रायणीनगर येथील रक्तदानाचीही त्यांनी पाहणी केली.

Smart City Project : इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.