Ironman Abhishek Nanaware : अवघ्या अठराव्या वर्षी बारामतीचा अभिषेक बनला ‘आयर्नमॅन’

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे.

शारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने 180 किलोमीटर सायकलींग, 42.2 किलोमीटर धावणे आणि समुद्रात 3.8 किलोमीटर अंतर समुद्रात पोहणे ही आव्हाने 13 तास 33 मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेतील गबेरा येथे ही स्पर्धा पार पडली.

अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्नमॅन हा किताब पटकविला आहे. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली आहे.

“अभिषेक याच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे, त्याच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिषेकचे कौतुक केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अभिषेक ननवरे याचे कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे पार पडलेल्या जागतिक पातळीवरील आयर्नमॅन स्पर्धेत बारामती येथील अभिषेक सतीश ननवरे याने यश संपादन केले. ही अतिशय खडतर स्पर्धा त्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी पूर्ण केली. या उज्ज्वल यशाबद्दल अभिषेक, त्याचे प्रशिक्षक व‌ पालकांचे हार्दिक अभिनंदन.‌’ असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.