IPL 2021 : अटीतटीच्या लढतीत मोठया विजयासह केकेआर ने वाढवली प्ले ऑफ मध्ये जाण्याची आस

मुंबई पुढे आता खूप मोठा विजय मिळवून दाखवण्याचे आव्हान.

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) महत्वाच्या सामन्यात कोलकाता संघाने आपला खेळ उंचावून राजस्थान रॉयल्सचा सुपडा साफ करून मोठा विजय तर मिळवलाच, पण त्याचसोबत प्ले ऑफ मधे असण्याची आशाही जिवंत ठेवून मुंबई इंडियन्सपुढे खूप मोठा विजय मिळवण्याचे कठीण लक्षही ठेवले आहे.

आज नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती असल्याने केकेआर आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना करो वा मरो या स्थितीत अन सत्याचीही जाणीव असल्याने दोन्हीही संघ जीव तोडून खेळणार आणि यामुळे एक रोमांचक सामना बघायला मिळणार या खात्रीने क्रिकेटरसिक या सामन्याकडे डोळे लावून होते.

शारजाच्या मैदानावर झालेल्या आजच्या दिवसातल्या दुसऱ्या आणि आयपीएल 2021 च्या आजच्या 54व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली अन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आधी फलंदाजी करून लक्ष ठेवण्यापेक्षा त्याने लक्षाचा पाठलाग करायला जास्त पसंती दिली.

कोलकाता संघाला सुद्धा जिंकणे अत्यावश्यक असल्याने त्यांनी मोठे लक्ष देण्यासाठी फलंदाजी सुरू करताना शुभमन गील आणि वेंकटेश अय्यर या जोडीला सलामीला पाठवले. दोघांनीही सावध सुरुवात करताना एकेरी दुहेरी धावांसोबतच खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेत चांगली सलामी दिली.

दहा षटकात 79 धावांची भागीदारी नोंदवल्यानंतर चांगले खेळत असलेल्या वेंकटेश अय्यरला राहुल टेवटीयाने वैयक्तिक 38 धावांवर त्रिफळा बाद करून ही जोडी फोडली. आणि आणखी 13 धावांची भर पडते न पडते तोच नितीश राणा सुद्धा वैयक्तिक 12 धावा काढून ग्लेन फिलीप्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्याने 5 चेंडूत 12 धावा काढताना एक चौकार आणि एक षटकार मारला,पण मोठी खेळी करण्यात त्याला यश आले नाही. त्याच्या जागी आलेल्या राहुल त्रिपाठीने शुभमन गीलला साथ देत डाव पुढे नेला. दोनच गडी बाद झाले असले तरी दहा षटकानंतर शारजाच्या मैदानावर धावा काढणे नेहमीच अवघड ठरत असते, आजही याचीच प्रचिती आली.

पण युवा शुभमन गीलने मात्र जबरदस्त फलंदाजी तीही जबाबदारी योग्यरित्या पार पाडून केली. आपले या मोसमातले आणखी एक अर्धशतक पुर्ण करताना त्याने केवळ त्याने केवळ 40 चेंडू घेतले, मात्र अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो लगेचच ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालच्या हाती झेल देवून 56 धावांवर बाद झाला, ज्यामध्ये 2 षटकार आणि चार चौकार सामील होते.

16 व्या षटकात तो बाद झाला तेव्हा कोलकाता संघाची धावसंख्या तीन गडी बाद 133 अशी होती.पण राहूल त्रिपाठी, कर्णधार मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे केकेआरने 171 धावांचे मोठे लक्ष राजस्थान रॉयल्सपुढे उभे केले. शारजा मैदानावरचे मागील काही सामने बघता हे लक्ष नक्कीच कठीण होते.

त्यात एवढे मोठे आव्हान पार पाडायचे असेल तर सुरुवात चांगली व्हायला हवी, पण नेमके याच्याच विरोधात राजस्थानच्या बाबतीत घडले. यशस्वी जैस्वाल डावातल्या तिसऱ्याच चेंडुवर भोपळा न फोडताच शकीबच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला, तर आणखी चार चेंडू नंतर कर्णधार संजू संघाची साथ साथ सोडून तंबूत परतला. त्याला शिवम मावीने केवळ एका धावेवर बाद केले.

या धक्क्यातून राजस्थान रॉयल्स सावरण्या आधीच दुसरा सलामीवीर लिविंगवुडही सहा धावा काढुन फर्ग्युसनची शिकार झाला अन पुढच्याच चेंडुवर पदार्पण करणारा युवा अनुज रावतला फर्ग्युसनने शून्यावर पायचीत करून राजस्थान ची अवस्था चार बाद 13 अशी अनरॉयल केली.

या धक्क्यातून राजस्थान रॉयल्स सावरलेच नाही, ग्लेन फिलिप्स 8 तर शिवम दुबे 18 धावा करून पाठोपाठ बाद झाले. या दोघांना शिवम मावीने बाद केले. 6 बाद 36 अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्स सावरणार नाहीच असे चित्र होते. अन कोलकाताच्या गटात आनंदाचे वातावरण होते तर त्यात गैर काय?याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा म्हणतात ते खोटे नाही. फक्त किती मोठा विजय मिळणार एवढीच उत्सुकता उरली होती.

राहुल टेवटीयाने थोडा फार प्रतिकार केला खरा पण तो फारच तोकडा पडला आणि अखेर राजस्थान रॉयल्सचा संघ सर्वगडी बाद 85 च धावा करू शकला. केकेआर कडून शिवम मावीने अप्रतिम गोलंदाजी करत चार गडी बाद केले तर लॉंकी फर्ग्युसनने तीन गडी बाद केले. कोलकाता संघाने सर्वांगीण खेळ करून मोठ्या सामन्यात कसे खेळावे याचेच जबरदस्त प्रदर्शन आज करून आपले आव्हान जिवंत ठेवले आहे .

उद्याच्या सामन्यात आता मुंबई इंडियन्सला किमान 11 षटके राखून अथवा 100 हुन अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल, त्यामुळे आता मुंबई इंडियन्स कमाल करून कोलकाताला मागे टाकणार की कोलकाता संघच चौथ्या स्थानावर विराजमान होणार ते येत्या काहीच तासात कळणार आहेच.आयपीएल मधले आपले सर्वोत्तम प्रदर्शन करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शिवम मावीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.