Chinchwad News : दिवाळीला गावी जाताय… मग चोरट्यांची तुमच्या घरात दिवाळी होऊ नये याची काळजी घ्या!

एमपीसी न्यूज – गावची यात्रा आणि दिवाळी या दोनच सणाला गावापासून दूर शहरात वसलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचा योग येतो. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना तिकीट बुकिंग, बॅगा भरणे, खरेदी अशी तयारी सर्वांनीच सुरु केली आहे. पण तुम्ही दिवाळीसाठी गावी जाल आणि इकडे तुमच्या घरात चोरटे दिवाळी साजरी करतील, असे व्हायला नको. यासाठी घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, तसेच घरांना मजबूत दरवाजे, कुलूप आणि सेफ्टी यंत्रणा बसवा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अनेकांना दिवाळी सणासाठी अथवा अन्य प्रसंगी गावी जाताना सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे, स्टोरी बनवणे अशी सवय असते. पण ही सवय तुमच्या अंगलट येऊ शकते. अनेक चोरटे सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असतात. तुमचे स्टेटस पाहून तुमच्या घरात कोणी नाही याची त्यांना खात्री होते. यामुळे तुमच्या घरी चोरी होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर स्टेटस ठेवताना, स्टोरी बनवताना काळजी घ्या.

गावी जाताना मौल्यवान वस्तू, दागिने तसेच पैसे घरात ठेवणे टाळा. शक्य असल्यास एखादा सदस्य घरी ठेवा. मौल्यवान वस्तू, पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. घराचा चांगल्या प्रतीचे कुलूप, दरवाजे बसवा. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवा. अनेक घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर देखील चोरून नेतात. यामुळे सीसीटीव्ही कॅमे-यात चोरीची घटना कैद होऊनही उपयोग होत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा.

घर, सोसायटीच्या परिसरात संशयित हालचाली दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अनेक घटनांमध्ये चोरटे सुरुवातीला घरांची, परिसराची रेकी करतात आणि संधी साधून घरफोडी, चोरी करतात. त्यामुळे संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना दिल्यास हा धोका टाळता येईल.

घर, सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक ठेवा. सुरक्षा रक्षकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या. घर, सोसायटीच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा उजेड राहील, याचीही दक्षता घ्या. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे त्यांचे काम करतात. त्यांना ही संधी देऊ नका. घराला कुलूप लावून गावी गेल्यानंतर आठवड्या, दोन आठवड्याने घरी येणार असाल तर सोसायटीमध्ये शेजारी ज्या घरात लोक असणार आहेत, त्यांना फोन करून चौकशी करा.

गावी जाताना, प्रवास करताना तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिन्यांची काळजी घ्या. प्रवासात देखील अनेक ठग, चोरटे तुमचा पाठलाग करण्याची शक्यता असते. बोलण्यात गुंतवून अथवा काहीतरी कारणाने तुमचे साहित्य लंपास होऊ शकते. त्यामुळे प्रवासात साहित्याची काळजी घ्या.

मागील वर्षी दिवाळीच्या महिन्यात (नोव्हेंबर 2020) पिंपरी-चिंचवड शहरात 26 घरफोड्या झाल्या. त्यातील तीन घरफोड्या दिवसा तर 23 घरफोड्या रात्रीच्या वेळी झाल्या आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये 249 घरफोड्या झाल्या असून त्यातील 28 घरफोड्या दिवसा झालेल्या आहेत. त्यामुळे घरांची रात्रीएवढीच दिवसा देखील काळजी घेणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.