Pimpri News : राजकारणापेक्षा साहित्यिक ‘गुंता’ हा सकारात्मक – डॉ. नीलम गोऱ्हे 

एमपीसी न्यूज – ‘राजकारण हे गुंतागुंतीचे असते त्यामध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक बाबी डोकावत असतात. परंतु लेखक राजन लाखे यांच्या ललित लेखसंग्रहातील ‘गुंता’ हा पूर्णपणे सकारात्मक विचारांचा असून वाचकाला ऊर्जा देणारा आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. 

संवेदना प्रकाशन प्रकाशित, राजन लाखे लिखित ‘गुंता’ या वैचारिक ललित लेख संग्रहाच्या प्रकाशन वेळी आभासी सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन त्या बोलत होत्या. यावेळी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, लेखक राजन लाखे, ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत पाटणे, प्रकाशक नितीन हिरवे आदि उपस्थित होते.

डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते ‘गुंता’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन झाले. पाटील म्हणाले, ‘आयुष्याच्या टप्प्यावर विविध अडचणी गुंता निर्माण करतात. प्रत्येकाला हा गुंता स्वतःच सोडवायचा असतो. लाखे यांचे हे पुस्तक त्यासाठी मोलाचे मार्गदर्शक ठरणारे असून गुंता सोडवण्यास मदत करणारे आहे.’

पुस्तकाला प्रस्तावना लिहणारे डॉ. न. म. जोशी म्हणाले, ‘जानवे घालताना प्रथम त्याचा गुंता सोडवावा लागतो. त्याला ब्रह्मगाठ असते आणि ती सापडली की काम सोपे होते. त्याचप्रमाणे जीवनातली नेमकी ब्रह्मगाठ सापडली की झालेला गुंता सुटायला वेळ लागत नाही. लाखे यांना ही गाठ सापडली असून सकारात्मक पद्धतीने त्यांनी आयुष्यातील गुंत्याचे अनेक रंग उलगडून दाखविले आहेत.’ असे जोशी म्हणाले.

या पुस्तकाचे विश्लेषण करताना डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, ‘मानवी देहामध्ये विवेक आणि विचार या दोन्ही गोष्टी सुप्त असतात. परिस्थिती आणि घटना याप्रमाणे विचार बदलत असले तरी मंगलमय विचारातूनच विवेकाची निर्मिती होत असते आणि हे लाखे यांच्या गुंता ललितसंग्रहात पानोपानी जाणवते. त्यांच्या या पुस्तकात साध्या आणि सोप्या शब्दात वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या दैनंदिन जीवनाचे सार प्रत्येकाने आत्मसात केले तर जीवनाची वाटचाल सोपी होईल हे निश्चितपणाने सांगू इच्छितो.’

राजन लाखे यांनी सदर पुस्तकामागची संकल्पना सांगून मनात येणाऱ्या चांगल्या वाईट विचारांवर विचार करणाऱ्या मनाला केंद्रस्थानी ठेऊन या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे सांगितले. प्रकाशक नितीन हिरवे यांनीही मनोगत व्यक्त केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.