Maharashtra Corona Update : संसर्ग मंदावतोय! राज्यात आज 15 हजार नवे रुग्ण, 33 हजार डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी वीस हजारांहून कमी नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. आज (सोमवारी) 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 33 हजार बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 57 लाख 46 हजार 892 इतका झाला आहे. त्यापैकी 53 लाख 95 हजार 370 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, आज 33 हजार बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात 2 लाख 53 हजार 367 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज राज्यात 184 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 95 हजार 344 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.66 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 93.88 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 50 लाख 55 हजार 054 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 18 लाख 70 हजार 304 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 10 हजार 743 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत. सर्वत्र एकसारखे आदेश लागू न करता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 15 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू राहतील. नवीन नियमावलीनुसार 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.