Manobodh by Priya Shende Part 39 : मनोबोध भाग 41 – बहु हिंडता सौख्य होणार नाही

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 41 

बहु हिंडता सौख्य होणार नाही 

शिणावे परी नातुडे हित काही 

विचारे बरे अंतरा बोधवीजे 

मना सज्जना राघवी वस्ती कीजे

या श्लोकात समर्थ सांगताहेत की बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे उगीचच खूप हिंडलं तरी सुख मिळेलच असं नाही.

माणसाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. त्याच्या त्या कल्पनेनुसार तो सुखासाठी धडपडत असतो.  त्यासाठी वेगवेगळे मार्ग पण चोखाळत असतात.  काही जण सन्मार्गाने वाटचाल करत असतात.  यामध्ये व्रतवैकल्य, पूजाअर्चा, तीर्थयात्रा, उपास-तापास इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. काही जण  सत्संग करतात. संतांच्या सोबत राहून कीर्तन-प्रवचन ऐकतात. काही जण दानधर्म करतात.  ज्याला ज्याच्यात मनाला समाधान वाटेल ते करतात.  त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण हे ते सुख खरं नाही.

तसंच काही माणसं वाईट मार्गाने वाटचाल करतात.  दुसऱ्याचा पैसा लुबाडणे, भोळ्या लोकांची फसवणूक करणे. वर वरचा सुखाचा रस्ता दाखवणे आणि स्वतःचा फायदा करून घेणे.

दोन्ही मार्गातून सुख मिळवण्याचा माणूस प्रयत्न करतो.  पण त्यांच्या हाती खरं म्हणजे काही लागत नाही.  समर्थ म्हणतात की, अशी धडपड करून सुखाच्या मागे लागलं, तर सुख हाती लागणार नाही.  वेळ मात्र वाया जाईल.  बहु म्हणजे अती. कोणतीही गोष्ट अती केली तर, त्याचा परिणाम चांगला होईलच असं नाही.  आपल्या चरितार्थासाठी,  व्यवहारासाठी,  व्यापारासाठी फिरणं वेगळं आणि उगीच सुख शोधत हिंडणं वेगळं. पैशाने सुख मिळत नाही खिशात पैसा आहे म्हणून फिरत राहणं हे योग्य नाही त्यातला आनंद पण तात्पुरताच आहे.  मग खरं सुख आपल्याला कसं मिळेल तर, त्यासाठी समर्थ सांगताहेत की, विचारे बरे अंतरा बोधवीजे.

म्हणजे ते म्हणतात, हे मना, चांगल्या विचारांनी तो अंतःकरणाला वळण लाव. त्याला शिकव.  बाह्य सुख हे तात्पुरतं असतं. त्याने मनाला समाधान मिळेलही, पण ते क्षणिक असतं,  हे मनाला पटवायला पाहिजे.

संत जो मार्ग आखून देतील, त्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. तो मार्ग मोक्षप्राप्तीचा आहे. आणि आपल्याला मोक्ष हवा असेल तर समर्थांनी सांगितल्यानुसार “मना सज्जना राघवी वस्ती कीजे”. म्हणजेच तू राघवाची भक्ती कर.  त्याच्या ठायी रहा. त्याच्या चरणाशी जागा माग. कारण तोच तुझा उद्धार करणारा आहे.

जय जय रघुवीर समर्थ 

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.