DC vs MI : मुंबईने दिल्ली संघाला 5 गडी राखुन केले पराभूत

मुंबईच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची लागली लॉटरी

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघातल्या आजच्या लढतीत विजयाचे पारडे कधी इकडे कधी तिकडे झुकत राहिले. मात्र टीम डेविडला  महत्वाच्या एका चुकीच्या निर्णयाने जीवदान मिळाले आणि त्याचा त्याने जबरदस्त फायदा उठवत 11 चेंडूत 40 धावा ठोकल्या ज्यामुळे ईशान किशन आणि ब्रेविसच्या विकेट्स पडल्यानंतर दिल्लीच्या हातात आलेला सामना मुंबई इंडियन्सने 5 गडी आणि तितकेच चेंडू राखून जिंकला.

त्याचवेळी दिल्लीचा पराभव करत अप्रत्यक्षरित्या बंगलोर संघाला प्ले ऑफ मधली जागा पक्की करुन देण्यात चमत्कारिक वाटा उचलला आहे.स्पर्धेच्या शेवटी शेवटी लय पकडणाऱ्या जस्सी बुमराहने आजही आपल्या कीर्तीला जागत  गोलंदाजी करत दिल्ली संघाला जबरदस्त धक्के देत तीन महत्वपूर्ण बळी घेतले. ही कामगिरी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यासाठी पुरेसी होती.

दिल्लीसाठी विजय अत्यंत महत्वाचा असल्याने त्यांच्यासाठी करो वा मरो अशी परिस्थिती असलेल्या तर पाच वेळेसच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला आपला आत्मसन्मान जपण्यासाठी विजय हवा असलेल्या या दोन संघात साखळी फेरीतला आजचा टाटा आयपीएल 2022 मधला 69 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला गेला,ज्यात रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.मुंबईसाठी या मोसमातला हा अंतीम सामना असल्याने आज तरी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल असे त्यांच्या असंख्य चाहत्यांना वाटत होते पण अर्जुनसह त्या सर्वांचा अपेक्षाभंगच झाला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अतिशय खराब झाली,डावाच्या तिसऱ्याच षटकात डेविड वॉर्नर  वैयक्तिक 5 धावा करुन डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर बाद झाला तर त्यानंतरच्याच षटकात बुमराहने मार्शला शून्यावर बाद करुन दिल्लीची अवस्था बिकट केली. या झटक्यातून सावरण्याआधीच दुखापतीनंतर पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ सुद्धा  वैयक्तिक 24 धावा काढुन बुमराहच्याच गोलंदाजीवर बाद झाला. आणि हे कमी की काय म्हणून आक्रमक सर्फराज सुद्धा फक्त 10 धावा करुन मार्कंडेच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि दिल्ली संघाची अवस्था 8.4 षटकात 4 बाद 50 अशी कठिण झाली होती.

यावेळी मैदानावर होते कर्णधार ऋषभ पंत आणि आक्रमक रोवमन पॉवेल. या जोडीने धीराने आणि आक्रमक खेळत 75 धावांची चांगली भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. पंतने आज प्रगल्भता दाखवत फलंदाजी केली तर पॉवेलने दुसऱ्या बाजूने चांगलाच हल्ला चढवला. ही जोडी बऱ्यापैकी स्थिर झाली आहे असे वाटत असतानाच आधी 39 धावा काढून पंत बाद झाला तर त्यानंतर थोड्याच वेळात पॉवेलही 43 धावा काढून बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

मात्र अक्षर पटेलने ताबडतोब अंदाजात नाबाद 19 धावा काढत दिल्ली संघाला 159 धावांची चांगली आणि सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.4 बाद 50 वरुन 7 बाद 159 ही धावसंख्या नक्कीच दिल्ली संघाचे मनोबल वाढवणारी होती, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दिल्लीवरचे दडपण वाढवण्यात अपयश आले आणि त्याचाच फायदा उचलत दिल्लीने चांगली धावसंख्या गाठण्यात यश मिळवले. मुंबई कडून बुमराहने 3 तर रमनदीपने दोन गडी बाद केले.

मुंबई संघाला जय वा पराजयाने फारसा फरक पडणार नव्हता, पण किमान या विजयाने त्यांचा या हंगामातला प्रवास तरी आनंदी झाला असता. त्यादृष्टीने सुरुवात करताना रोहीत आणि ईशान किशन या जोडीने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या गडयासाठी  25 च धावा जोडल्या असताना कर्णधार रोहीत फक्त 2 धावा करुन नोर्जेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मात्र ईशान किशन आणि डिवाल्ड ब्रेविस या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची छोटी पण महत्वपूर्ण भागीदारी करुन विजयाकडे मार्गक्रमण केले.

ब्रेविसने आक्रमक  अंदाजात खेळत 33 चेंडूत 37 धावा केल्या, ज्यात 3 षटकार सामील होते. त्याला ईशान किशननेही चांगली साथ दिली. ही जोडी चांगली जमली आहे असे वाटत असतानाच ईशान किशन 48 धावा काढून कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर त्यानंतर थोड्याच वेळात ब्रेविसही 37 धावा काढून ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यावेळी मुंबईची धावसंख्या 15 व्या षटकात 3 बाद 95 होती. यावेळी विजयाचे  पारडे थोडेसे दिल्लीच्या बाजूने झुकले होते.

त्यानंतर मात्र टीम डेविड आणि तिलक वर्माने जबरदस्त फलंदाजी करत सामन्याचे चित्रच बदलून टाकले.टीम डेविडने फक्त 11 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत दणदणीत 34 धावा चोपल्या,त्याला तिलक वर्मानेही 21 धावा करुन उत्तम साथ दिली. आणि विजयाचे पारडे पुन्हा मुंबईच्या बाजूने झुकले.

हे दोघेही थोड्याफार अंतराने बाद झाल्यावर सामना पुन्हा एकदा दोलायमान अवस्थेत आलाय असे वाटत असतानाच रमनदीप सिंगने जबरदस्त फलंदाजी करत 6 चेंडूत नाबाद 13 धावा करुन मुंबई संघाला 5 गडी आणि 5 चेंडू राखून विजयी केले आणि दिल्लीचा पराभव झाला. ज्याचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला झाला आणि टाटा आयपीएल 2022 मधला चौथा आणि अंतीम संघ म्हणुन प्ले ऑफ मध्ये प्रवेश करता झाला. आजच्या लढतीतले हे दोन्हीही संघ  आयपीएल 2022 मधून आता बाहेर पडले आहेत आणि त्यांचा प्रवास आता यावर्षीसाठी तरी संपला आहे.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स

7 बाद 159
पृथ्वी शॉ 24,पंत 39,पॉवेल 43,अक्षर  नाबाद 19
बुमराह 25/3,रमनदीप 29/2,सॅम्स 30/1,मार्कंडे 26/1
पराभूत विरुद्ध

मुंबई इंडियन्स

19.1 5 बाद 160
ईशान किशन 48,ब्रेविस 37,टीम डेविड 34,तिलक बर्मा 21,रमनदीप सिंग नाबाद 13
नोर्जे 37/2,ठाकूर 32/2, यादव 33/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.