Pimpri News : ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ला प्रतिसाद; 14 दिवसात पालिकेकडे 158 अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी स्वतः मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 दिवसात पालिकेकडे 158 अर्ज आले आहेत. याअंतर्गत मालमत्ता नोंदणी करणा-यांना सामान्य करात 5 टक्के सवलत देण्यात येत आहे. याबाबतची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

मालमत्ताधारकाने महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. नव्याने होणारी बांधकामे, वाढीव बांधकाम वापरात बदल अशा विविध प्रकारच्या मालमत्ता सतत वाढत असतात. या मालमत्तांना प्राधान्याने कर आकारणी होणे आवश्यक आहे. मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी मालमत्ताधारक स्वतः महापालिकेच्या संकेतस्थळावर मालमत्ता नोंदणीसाठी अर्ज करत असेल तर अशा मालमत्तांना सामान्य करात 5 टक्के सूट पहिल्या वर्षाकरिता दिली जाणार आहे.

त्यासाठी 17 विभागीय कार्यालयामधून 158 जणांनी अर्ज केले आहेत. तर, महापालिकेने विशेष नोटीस दिलेल्या 10 अर्जदारांनी नोंदणी केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 26 हजार 858 रुपये महसूल जमा करण्यात आला आहे. तर विशेष नोटीस नसलेल्या 144 जणांनी स्वयंस्फूर्तीने माझी मिळकत माझी आकारणी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक थेरगाव विभागातून 15, चिखली 24 तर निगडी प्राधिकरण विभागातून 11 जणांनी अर्ज केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.