Manobodh by Priya Shende Part 6 : मनोबोध भाग 6 – नको रे मना क्रोध हा खेदकारी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक सहा.

नको रे मना क्रोध हा खेदकारी

नको रे मना काम नानाविकारी

नको रे मना सर्वदा अंगीकारू

नको रे मना मत्सरू दंभ भारू

क्रोध, काम, मद, मत्सर या चार मनुष्य शत्रूंचा परामर्श या श्लोकात समर्थांनी घेतलाय.

क्रोध म्हणजे राग. माणसाला आपल्या मनासारखं झालं नाही किंवा न पटणारी गोष्ट डोळ्यासमोर आली किंवा अपमान झाला, अपशब्द आले की क्रोध निर्माण होतो या क्रोधा पायी खूप नुकसान होतं.

अन्याय झाला की राग येतो आणि मग मनावर ताबा राहात नाही आणि त्याची प्रतिक्रिया ही एखाद्या भयानक गुन्हया पर्यंत जाऊ शकते. क्रोध येऊन भलतंसलतं कृत्य घडायला नको आणि मग पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून, हा मनात क्रोध नकोच, असं समर्थ मनाला बजावत आहेत. दैनंदिन जीवनात आपण कुठला तरी राग कशावर तरी काढत असतो. कार्यालयांमधला वरिष्ठांचा राग घरी नवरा-बायको किंवा मुलांवर काढतो आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. राग शांत झाल्यावर आपल्यालाच वाईट वाटतं, पण वेळ निघून गेलेली असते.

दुसरा शत्रू आहे कामवासना. माणसाची काम ही गरज नक्की आहे. त्यासाठी कामभावना ही असलीच पाहिजे. पण त्याची वासना असू नये. नाहीतर सतत तेच विचार मनात घोळत राहतात, जे कर्म करायला जन्म घेतलाय, त्याचा विसर पडून माणूस सतत कामवासनेतच गुंतून पडतो. त्यामुळे मनाला परत एकदा, या शत्रुपासून समर्थ सावध करत आहेत आणि म्हणत आहेत की मनात कामवासना नको. ह्या कामवासने मुळे नाना विकार संभवतात आणि मनुष्याचा पशु होतो.

अति लोभाने माणूस संपत्ती गोळा करतो आणि एकदा संपत्तीची हाव सुरू झाली, की कुठे थांबावं हे त्याला कळत नाही.. मग माणसात अहंकार निर्माण होतो. सर्व संपत्ती ही मी कमवली आहे असं त्याला वाटू लागतं. त्याची मस्ती चढू लागते. हळूहळू त्याचा विनियोग चुकीच्या मार्गाला होऊ लागतो. व्यसन, जुगार, मदयंपान, परस्त्री ह्याच्या कडे वाहत जातो. माणूस बेछूट होतो. त्यासाठी समर्थ मनाला सांगत आहेत की अति लोभ नको आणि मद, मत्सर नको.

त्याचबरोबर माणसाने दुसऱ्याचा हेवा करणे थांबवलं पाहिजे. मी कोणीतरी महान आहे असा अहंकार मनात आला की तो माणूस दुसऱ्याला तुच्छ लेखू लागतो. आणि जर दुसरा यशस्वी झाला तर मत्सर निर्माण होतो. तो मनुष्य कोणत्याही थराला जातो, ज्याने माणसाचा सर्वनाश होतो. म्हणून समर्थ सांगत आहेत की मनात मत्सर द्वेष आणू नकोस.

माणसाचं मन नियंत्रित असलं पाहिजे. या शत्रूवर विजय मिळवता आला पाहिजे, असं समर्थ सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.