Manobodh by Priya Shende Part 66 : नव्हे सार संसार हा घोर आहे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 66 (Manobodh by Priya Shende Part 66)

नव्हे सार संसार हा घोर आहे

मना सज्जना सत्य शोधूनी पाहे

जनी विष खाता पुढे सुख कैचे

करी रे मना ध्यान या राघवाचे

सुरुवातीच्या चरणांत (Manobodh by Priya Shende Part 66) समर्थ समजून सांगत आहेत की संसाराने सुख वाट्याला येतं, ते क्षणिक असतं. म्हणून ते म्हणताहेत कि संसारात दुःखच वाट्याला येणार. प्रपंच फोल आहे. त्यातलं सत्य शोधून काढून ते नीट समजून घ्यायला सांगताहेत. संसार आला की मोह, माया या सगळ्यात माणूस गुरफटतो. माणूस त्या संसारात गुंतून पडतो.

आपलं शिक्षण, तरूणपण, नोकरी, व्यवसाय, बढती, लग्नं, मुलं-बाळं, मग त्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी-व्यवसाय, त्यांची लग्नं, त्यांची मुलं-बाळं, मग स्वतःचे आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू हा सर्वसामान्य लोकांचा जीवनक्रम असतो. ह्याच्या पेक्षा वेगळं काही करण्याची त्याची क्षमता, ताकद तो गमावून बसतो. अगदी तरुण असलेला माणूस केव्हा म्हातारपणाकडे झुकतो ते त्यालाही कळत नाही. आणि शेवटी शेवटी त्याला कळतं की संसार फोल आहे आणि आपण उगीच त्यात गुंतून पडलो. कारण हाती तर काहीच लागलं नाही. पण ते समजेपर्यंत उशीर झालेला असतो.

Mahatashtra Political Crises : काय सांगता! अखेरच्या दोन दिवसात 1690 कोटींच्या कामांना मंजुरी

आयुष्यातला बराचसा काळ निघून गेल्यावर परमेश्वराचं नाव घेऊन काय फायदा? तेव्हा त्याचं नामस्मरण करून काय फायदा? बघता बघता मृत्यू समोर येतो. तेव्हा त्याला कळतं की आपण भौतिक सुखासाठी धडपड करत होतो. ज्यासाठी धडपड केली ती सगळी सुखं क्षणिक होती. संसार कितीही वरवर पणे सुखाचा वाटला, तरी खरं तर तेच दुःखाचे कारण होतं. दुःखाचं मूळ तो संसारच आहे. हेच सत्य शोधून काढ असं समर्थ आपल्याला सांगताहेत. दुसऱ्याने सांगून पटत नाही. त्यामुळे स्वतःचा अनुभव घ्या म्हणून समर्थ सांगताहेत की तू सत्य शोधून पहा.

इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक मनुष्य जंगलात जातो. तिथे एक साधू बाबा त्याला भेटतात. तो माणूस साधू बाबांना विचारतो की, “बाबा मला रात्री झोप येत नाही, काहीतरी उपाय सांगा”. साधूबाबा त्याला एका झोपडीत राहायला सांगतात. रात्र होते आणि हा माणूस गळ्यातील सोन्याची चेन, बोटातल्या आंगठ्या.. सगळं काढतो एका कापडात बांधतो आणि उशीखाली ठेवून झोपायला लागतो. परत उठतो आणि ते सगळं खिशात ठेवतो. आणि झोपायला लागतो. साधूबाबा ते सगळं बघत असतात. पहाटे केव्हातरी त्या माणसाला जाग येते. आणि तो बघतो की त्याच्या सोन्याच्या वस्तू गायब झालेल्या असतात. अत्यंत अस्वस्थपणे, दुःखी होऊन तो साधूला विचारतो की, “बाबा, माझ्याकडच्या मौल्यवान वस्तू दिसत नाहीयेत”. बाबा म्हणतात, “मीच समोरच्या पाण्यात फेकून दिल्या. तुला सुखाची झोप हवी होती ना? आता शांत झोपशील तू”. तात्पर्य हेच की भाैतिक सुख हे तात्पुरतं आहे. मोहमायेच्या संसारामुळेच दुःख वाट्याला येतं. सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतर लोकांच्या किंवा स्वतःच्या उदाहरणावरून शिक. काही बोध घे.

हेच समर्थ उदाहरण देऊन आपल्याला सांगताहेत की,” जनी विष खाता पुढे सुख कैचे”. एखाद्या माणसाने विष खाल्लं तर त्याला सुख कसे मिळेल? त्या विषामुळे झालेल्या वेदनांनी त्याचा जीव तडफडत राहील तळमळत राहील त्याला अशा विषापासून सुख मिळणं कधीतरी शक्य आहे का?

त्याचप्रमाणे संसारात गुंतून पडलेल्या माणसाला, ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या माणसाला, कधीतरी आनंद मिळणं शक्य आहे का?

म्हणून प्रत्येकाने प्रपंचाचा फोलपणा समजून घ्या. नेमके सत्य काय आहे हे शोधून काढा. आणि त्यासाठी समर्थ मार्ग सुचवत आहेत.. तो म्हणजे, “करी रे मना ध्यान या राघवाचे”.

कायम भगवंताच ध्यान करा. त्याचंच चिंतन, नामस्मरण करावं. त्याच्याशी एकरूप व्हावं. हा भवसागर तारायचा असेल तर, फक्त तो ईश्वरच आपली मदत करू शकतो. त्यामुळे संसारात किती वेळ घालवावा, हे भक्ताने डोळसपणे पाहून, आपलं चित्तं, आपलं ध्यान भगवंताकडे ठेवले पाहिजे. हे समर्थांनी आपल्याला समजून सांगितलय.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.