Manobodh by Priya Shende Part 67 : घनश्याम हा राम लावण्यरुपी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 67 (Manobodh by Priya Shende Part 67)

घनश्याम हा राम लावण्यरुपी

महाधीर गंभीर पूर्णप्रतापी

करी संकटी सेवकाचा कुढावा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

 

 

 

श्लोक क्रमांक 67 ते 76 या दहा श्लोकांच्या संचाचे शेवटचे चरण हे “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” अशा रचनेनं केलं आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या रामाचं चिंतन करा. भगवंताचं नाव घ्या. त्याचं नामस्मरण करा. आणि ते का करावं हे ही सांगितला आहे.  त्यासाठी त्यांनी भगवंताच्या रूपाचे वर्णन केलय.  त्याच्या गुणांचे वर्णन केलय.

निर्गुण आणि सगुण भक्ती असे दोन भक्तीचे प्रकार आहेत. त्यातली निर्गुण भक्ती ही अत्यंत वरच्या पातळीवरची आहे आणि सगुणभक्ति ही खालच्या पातळीवर समजले जाते. सर्वसामान्य लोकांना सगुणभक्ति पचनी पडते कारण ती अगदी सुरुवात आहे.

मनुष्य देहधारी आहे.  भगवंताने सुद्धा अवतार हे कोणत्या ना कोणत्या देहातूनच घेतले आहेत. त्यामुळे आपणही भगवंत कसा असेल तर तो आपापल्या कल्पनेप्रमाणे सगुण रूपातच कल्पना केलेला आहे.

त्यामुळे या दहाही श्लोकांमध्ये समर्थांनी परमेश्वराचे सगुण रूपाचे वर्णन केलं आहे.  समर्थांचं आराध्य दैवत म्हणजे श्रीराम.  त्यामुळे त्यांनी भगवंताच वर्णन करताना प्रभू श्रीरामांचे वर्णन केलं आहे.  आणि भगवंताचे रूप म्हणजे त्यांच्या डोळ्यांसमोर श्रीरामच आहेत.   आपल्याला पण बघा ना,  डोळे बंद करुन परमेश्वराचे नाव घ्यायला सांगितलं, तर आपल्याला आवडत असणाऱ्या देवाची मूर्ती किंवा प्रतिमा डोळ्यासमोर येते.  भगवान शंकर,  श्रीकृष्ण,  गणपती, लक्ष्मी, दत्तगुरु अशी अनेक आपली श्रद्धास्थानं असतात.  त्याचं रूप डोळ्यासमोर येतं. समर्थांचे दैवत श्रीराम असल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर सगुण रूपात राघवच येतात आणि ते त्यांचं वर्णन करतात “घनश्याम हा राम लावण्यरूपी”.

घनश्याम म्हणजे काळा सावळा. हा राम सावळा आहे.   गोर्‍या रंगात आकृष्ट करण्याची ताकद आहे, तर सावळ्या रंगात आपलेपणा आहे.  राम सगळ्यांना आपला वाटतो.  तो लावण्यरुपीआहे,  म्हणजेच सौंदर्यवान आहे.

“महाधीर गंभीर पूर्णप्रतापी”.  जसा सौंदर्यवान आहे, तसाच अत्यंत गुणवान आहे.  महाधीर म्हणजे धैर्यवान,  संयम असणारा, एक पत्नी, एक बाणी, एक वचनी आहे.  महापराक्रमी आहे,  तितकाच गंभीर आहे आणि पूर्णप्रतापी आहे.  दुष्टांचा संहार करणारा आहे, तर भक्तांना तारणारा आहे.

भक्तांवर, सेवकांवर संकट आलं तर श्रीराम त्यांचं संरक्षण करतो.  कुढावा म्हणजे रक्षण.  “करी संकटी सेवकाचा कुढावा”.   हाकेला तो ओ देतो.  हा भवसागर ताेच पार करून नेतो.  त्यासाठी त्याला शरण जायला पाहिजे.  म्हणून सुरुवातीपासूनच त्याची भक्ती केली पाहिजे. सतत त्याचं नामस्मरण केलं पाहिजे.

आपला दिवस हा पहाटे सुरू होतो.  म्हणजेच प्रभात समय होय.  प्रत्येकाने उठल्यावर सुरुवातीला रामाचं नाव घ्यावं. ईश्वराचं नाव घेतलं, म्हणजे नक्की पुढचा दिवस आनंदात समाधानात घालवता येईल.  दिवसभर मन रामाला चिंतत राहील.  दुसरे कुठले विचार मनात येणार नाहीत.  जसे आपण एखादी गाण्याची ओळ सकाळी गुणगुणली, की दिवसभर तेच गाणं गुणगुणत राहतो. त्याचप्रमाणे उठल्यावर सुरूवातीलाच रामाचं नाव घेतलं, ईश्वराचं नाव घेतलं, तर दिवसभर तेच नाव मनात घेतलं जाईल.

म्हणून समर्थांनी “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपदेश केलाय.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.