Maval News: ‘ही तर पैलवानी स्टाईल’, आमदार शेळके यांच्या लस सक्तीच्या फतव्यावर चंद्रकांतदादा यांची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील नागरिकांनी 15 जानेवारीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस न घेतल्यास क्वारंटाईन करण्याच्या मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या इशा-यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार शेळके यांची पैलवानी स्टाईल आहे. त्यामुळे ते म्हणतात. असे म्हणण्याची स्थिती पण लोकांनीच निर्माण केली ना? त्यामुळे सर्वांनी लक्ष घ्यावी असे पाटील म्हणाले.

मावळ तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. मावळ तालुक्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस घ्यावेत. ज्या नागरिकांनी दुस-या डोसची मुदत होऊनही घेतला नाही. त्यांनी 15 जानेवारीपर्यंत दुसरा डोस घ्यावा. अन्यथा 15 जानेवारीनंतर ती व्यक्ती बाहेर आढळल्यास त्याला क्वारंटाईन करण्याचा इशारा मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिला होता.

त्यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ”लोक अजूनही दुसरा डोस का घेत नाहीत हे मला कळत नाही. विदेशात तर दोन डोस घेणा-याला बक्षीसे द्यायला लागलेत. कशासाठी, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी पाहिजे का, दुस-या बाजूने अशा प्रकारची बळजबरी करुन चालणार नाही. पण, आमदार सुनील शेळके जे म्हणतात. ती त्यांची पैलवानी स्टाईल आहे. त्यामुळे ते म्हणतात. पण, असे म्हणण्याची स्थिती पण लोकांनीच निर्माण केली ना? 30 टक्के लोक कसे काय दुसरा डोस घेण्यापासून राहतात. लोकांनी लस घेतल्यास सुनील शेळके यांना बक्षीस मिळणार आहे का. तेही जनतेसाठीच बोलले. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन दुसरा डोस घेतला पाहिजे. दीड कोटी डोस महाराष्ट्रात पढून आहेत. आरे काय चाललंय काय, त्यामुळे नागरिकांनी डोस घ्यायला पाहिजेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.