Pune News : लता मंगेशकर यांच्या सिंहगड भेटीची आठवण

एमपीसी न्यूज – 1990 च्या दशकात लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर यांनी सिंहगड किल्ल्यास भेट दिली. या भेटीचा एकमेव फोटो वृत्तपत्र छायाचित्रकार रवींद्र जोशी यांनी टिपला. लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) सकाळी निधन झाले. त्यानंतर रवींद्र जोशी यांनी या फोटोबद्दल आठवण सांगितली.

1990 च्या दशकात एके दिवशी छायाचित्रकार रवींद्र जोशी सहज फिरण्यासाठी म्हणून सिंहगड किल्ल्यावर गेले. किल्ला पाहिल्यानंतर एका टपरीवर चहा पिण्यासाठी  ते थांबले असता एक गाडी त्यांच्यापासून पुढे गेली. त्यामध्ये डाव्या बाजूच्या सीटवर लता मंगेशकर बसल्या होत्या. जोशी यांनी जरा पुढे जाऊन पाहिले असता गाडी काही अंतरावर जाउन थांबली. गाडीतून लता मंगेशकर, पार्श्वगायिका मीना खडीकर आणि उषा मंगेशकर या तिघी उतरल्या. त्यांच्यासोबत त्यांची एक केअरटेकर देखील होती. लता मंगेशकर यांच्या गाडीच्या मागे सुरक्षारक्षकांची देखील गाडी होती.

लता मंगेशकर यांनी सिंहगड किल्ला फिरून पाहिल्यानंतर एके ठिकाणी त्यांनी मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि त्यांच्या केअर टेकरला उभं राहायला सांगितलं. त्या चौघीजणी त्यांचा फोटो काढत होत्या. हे रवींद्र जोशी यांनी पाहिले आणि त्यांनी पुढे जाऊन एक फोटो काढला. त्यावेळी लता मंगेशकर यांच्या सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकार जोशी यांना थांबवले.

त्यावेळी निगेटिव्ह कॅमेरे असल्यामुळे फोटो कसा आला हे जोशी यांना पाहता आले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी फोटो तयार केला. त्यादिवशी लता मंगेशकर यांनी बराच वेळ सिंहगड किल्ल्यावर घालवला. सिंहगड किल्ल्यावरील कट्ट्यावर बसून त्यांनी कांदा भाजी आणि मडक्यातले दही देखील खाल्ले असल्याचे रवींद्र जोशी सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.