Pimpri News : सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत माता रमाई यांचे देखील मोठे योगदान : बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – देशात सामाजिक परिवर्तन होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा लढा दिला. त्यांच्या अनुपस्थितीत आपले घर मोठ्या स्वाभिमानाने सांभाळण्याचे काम माता रमाई आंबेडकर यांनी केले. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या मोठ्या साथीनेच बाबासाहेब सामाजिक परिवर्तनाची लढाई लढले.  त्यामुळे खऱ्या अर्थाने  सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत माता रमाई यांचे देखील मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष  बाबा कांबळे यांनी व्यक्त  केले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी कामगार पंचायत  वतीने महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘रमाईच्या लेकरांचा सत्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला रिक्षा चालक,कागद काच पत्रा वेचक, सफाई कामगार, बांधकाम मजूर, टपरी पथारी हातगाडी धारक, कष्टकरी जनतेचा सन्मान करण्यात आला. यावेळी कांबळे बोलत होते.

भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. माजी नगरसेविका अश्विनी चिखले, माजी नगरसेवक अंकुश कानडे, महाराष्ट्र मजूर पक्षाचे भाऊसाहेब आडागळे, घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, कष्टकरी जनता महीला आघाडच्या जयश्री येडके, गौरी शेलार, मालू गवई यावेळी प्रमुख उपस्थित होते.

 

राजमाता जिजाऊ, माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आमच्या व अनेक महिलांच्या प्रेरणा आहेत. त्यांच्या लढ्याची व त्यागाची प्रेरणा घेऊन अनेक महिला घडत आहेत. त्यांचा सन्मान करून त्यांचे विचार जपण्याची जबाबदारी समाजिक संघटनांवर असल्याचे कांबळे म्हणाले. तामिळनाडूधील सरकारने महिला रिक्षा चालकांना 2 लाख रुपये मदत केली आहे.

त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही अशी मदत होणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. महाराष्ट्र मध्ये देखील सरकारकडून येणाऱ्या काळात महिला रिक्षा चालकांना मोठी मदत व्हावी, अशी सर्वांची मागणी असल्याचेही ते म्हणाले.

नागमा हडपद (बिगारी काम) रेणुका गायकवाड (घरकाम महिला) शरुबाई वाळेकर (टपरी पथारी धारक) संगीता गाडीवडार (साफ सफाई कामगार) शाईन शेख (साफ सफाई कामगार) शालनबाई खवडे (साफ सफाई कामगार) सगुना शिखरे (साफ सफाई कामगार) भामा शिरसागर (साफ सफाई कामगार) जयश्री साळुंखे (रिक्षा चालक) यमुना काटकर (रिक्षा चालक ) जयश्री मोरे (रिक्षा चालक ) यांना  सन्मानपत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.