MLC : उमा खापरे होणार पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या महिला आमदार

एमपीसी न्यूज – भाजपने महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने पिंपरी-चिंचवड (MLC) शहरातील पहिल्या महिल्या आमदार होण्याचा मान खापरे यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शहराला पहिल्यांदाच विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खापरे यांनी मोठी संधी दिली आहे. राज्यातील सत्तेत असतानाही आणि विरोधात असतानाही भाजपचे पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष लक्ष असून निष्ठावंताना पदे दिली आहेत.

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विधानपरिषदेवर निवडून येणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत खापरे यांचे नाव चौथ्या नंबरवर आहे. त्यामुळे त्या आमदार होणार हे निश्चित आहे. त्यांच्या निवडीवर 20 जून रोजी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान खापरे यांना मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहराला पहिल्यांदाच विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे.  शहराला चौथा आणि शहर भाजपला तीसरा आमदार मिळणार आहे.

पुण्यातील अनेकांना विधानपरिषदेचा आमदार होण्याची संधी मिळाली. परंतु, आजपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील (MLC) एकालाही विधानपरिषदेचा आमदार होण्याची संधी मिळाली नव्हती. खापरे यांच्या रुपाने पहिल्यांदाच शहराला विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे. उमा खापरे या भाजपच्या निष्ठावान आणि जुन्या पिढीतील कार्यकर्त्या आहेत. त्या सोनार समाजातून येतात.  खापरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन वेळा भाजपाच्या नगरसेविका होत्या. 2001-02  मध्ये त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या देखील होत्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

सुमारे 20 वर्षांपासून खापरे या प्रदेश भाजपा कार्यकारणीत विविध पदांवर कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षापदाची जबाबदारी आहे.  आता विधानपरिषदेसाठी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे त्यांना आता विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळणार आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खापरे यांना मोठी संधी पक्षाने दिली आहे.

भाजपचे शहरावर विशेष लक्ष,  मुंडे समर्थकांना न्याय!  

भाजपने पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष लक्ष दिले आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेले, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी दिली. लेखी समिती देऊन सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन अमित गोरखे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. मुंडे समर्थक सदाशिव खाडे यांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद दिले होते. आता उमा खापरे यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली आहे. भाजपने राज्यात सत्ता असताना आणि नसतानाही पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. तसेच शहरातील जुन्या, निष्ठावान, तीन मुंडे समर्थकांना खासदारकी, आमदारकी, महामंडळ देऊन न्यायही दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.