MPC News Special : ऑनलाईन टास्कच्या नावाने शहरात दररोज होते एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगत फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागील महिन्यात 36 जणांची ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून फसवणूक झाली आहे. (MPC News Special) कुठलेही तारतम्य न बाळगता एक लाखापासून ते 20 लाखांपर्यंतच्या रकमा लोकांनी डोळेझाकपणे गुंतवल्या असून आपण ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे, ती कंपनी आणि व्यक्ती ठग असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी पोलिसात धाव घेतली आहे.

ठगांची मोडस काय?
अचानक आपल्या व्हाट्सअपवर अनोळखी नंबरवरून मेसेज येतो. व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, अशी ऑफर सांगून टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करण्यास सांगितले जाते. तिथे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज करत असतात. कोणी एखादी गुंतवणुकीची स्कीम सांगतो. तर दुसरा त्यातून झालेला फायदा सांगतो. टेलिग्राम ग्रुप नव्याने जॉईन केलेल्या व्यक्तीला विश्वास बसेपर्यंत त्यावर संभाषण सुरु असते. खरोखर यात काही रक्कम गुंतवणूक केल्यास परतावा मिळतो, असा विश्वास बसल्यानंतर व्यक्ती किरकोळ रक्कम सुरुवातीला गुंतवतो. काही वेळेला त्याला 100 रुपये गुंतवण्यास सांगितले जाते. 100 रुपये गुंतवल्यानंतर व्यक्तीला 150 रुपये पाठवले जातात. पुन्हा व्यक्ती 500 – 1000 रुपये गुंतवणूक करतो. त्यावरही परतावा दिला जातो.

Vadgaon : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

तिथून पुढे खरा खेळ सुरु होतो. त्यानंतर पाच हजार, दहा हजार, 50 हजार रुपये गुंतवण्यास सांगितले जाते. ती रक्कम गुंतवल्यास त्याला कोणताही परतावा दिला जात नाही.(MPC News Special) तर आरोपींनी बनवलेल्या वेबसाईटवर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाईल तयार होऊन त्याने गुंतवलेली रक्कम आणि त्याच्या वॉलेट मध्ये जमा झालेली नफ्याची रक्कम दिसते. ती काढायची झाल्यास व्यक्तीला आणखी मोठी रक्कम गुंतवावी लागेल, असे सांगितले जाते. ही रक्कम लाखोंमध्ये असते. अगोदरचे पैसे बुडतील, या भीतीने व्यक्ती पुन्हा लाखो रुपये गुंतवणूक करतो. तरीही त्याला त्याची रक्कम काढता येत नाही. एखादी कंपनी म्हणून बोलणारे सायबर गुन्हेगार आकडा वाढवत जातात आणि व्यक्ती फसत जातो. काही लाख रुपये गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे व्यक्तीच्या लक्षात येते.

चार टप्प्यात होते फसवणूक

ऑनलाईन फसवणूक करताना सायबर गुन्हेगार चार टप्पे वापरतात. पहिल्या टप्प्यात व्यक्तीचा विश्वास संपादन केला जातो. एकदा विश्वास संपादन केला की पुढचे काम सोपे होते. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना कमी काळात मोठा फायदा होईल, असा मोह दाखवला जातो. त्या मोहाच्या जाळ्यात अडकल्यास पुढचे काम आणखी सोपे होते. यातच नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगितले जाते. गुंतवलेले पैसे नफ्यासह काढण्यासाठी आणखी मोठी रक्कम गुंतवावी लागेल, असे सांगून आणखी मोठ्या रकमा भरण्यास भाग पाडले जाते.

दरम्यान काहीतरी ऑनलाईन टास्क दिला जातो. तो पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले जाते. हा सायबर गुन्हेगारांचा तिसरा टप्पा असतो. चौथा टप्पा म्हणजे, नागरिकांना अशा गुंतवणुकीतील कोणताही धोका समजू दिला जात नाही. त्यामुळे अधिक लालसेपोटी ते गुंतवणूक करत राहतात.(MPC News Special) शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अनेकदा सुरुवातीलाच काही रक्कम गुंतवली असता हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजते देखील. परंतु गुंतवलेली रक्कम मिळविण्यासाठी पुन्हा मोठी रक्कम गुंतवली जाते. एका एका टप्प्यावर नागरिक फसवणुकीच्या जाळ्यात आणखी जास्त अडकत जातात.

गुंतवणूक करताना काळजी घ्या

अशा प्रकारे गुंतवणूक करताना नागरिकांनी चौकस बुद्धी वापरून काळजी घ्यायला हवी. आपण कोणत्या कंपनीसोबत व्यवहार करत आहोत. ती कंपनी खरोखर अस्तित्वात आहे का. त्या कंपनीची भारतीय कंपनी नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झाली आहे का. आपल्याशी संपर्क साधणारी व्यक्ती, कंपनी आणि आपण पैसे पाठवत असलेले बँक खाते; यांचा परस्पर संबंध आहे का. आपण गुंतवणूक केलेले पैसे कंपनी कुठे वापरते. कंपनीचे उत्पादन काय आहे, त्याला मान्यता आहे का. कंपनीने कोणासोबत काही कायदेशीर करार केले आहेत का. अशा प्राथमिक बाबींची खातरजमा केली असता समोरची अनोळखी व्यक्ती खरोखर कंपनीची प्रतिनिधी आहे अथवा सायबर गुन्हेगार आहे, हे लक्षात येऊ शकेल.

आपण गुंतवणूक करत असलेली कंपनी विदेशात आहे, असे सांगितले जाते. मात्र आपल्याकडून एखाद्या भारतीय खात्यावर पैसे घेतले जातात. (MPC News Special) खातेधारकाचे नाव आणि कंपनी यांचा कोणताही संबंध लागत नाही, अशा वेळी आपण अधिक सतर्क राहायला हवे.

धागेदोरे विदेशात असल्याची शक्यता

ज्या टेलिग्राम ग्रुपवरून हा सर्व फसवणुकीचा प्रकार होतो, त्यावरील काही क्रमांक हे विदेशातील असल्याचे निदर्शनास येते. मात्र प्रत्यक्षात फसवणूक करणाऱ्या व्यक्ती या त्या नंबर धारक असतीलच असे नसते. विदेशातील नंबर वापरून भारतातून देखील हे रॅकेट चालवले जाऊ शकते. व्हाट्सअप, टेलिग्राम या सोशल मीडियासाठी केवळ सीम क्रमांक असेल तर त्यावरून जगभरात कुठेही मेसेजिंग प्रणाली आपण वापरू शकतो. यामुळे फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनाही तपासासाठी अनेक अडचणी येतात.

सायबर पोलीस सांगतात

ऑनलाईन गुंतवणूक करताना खातरजमा करण्याचे आवाहन सायबर पोलीस करतात. पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार म्हणाले, “ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक अथवा आर्थिक व्यवहार करताना संपर्क साधणारी व्यक्ती, संस्था आणि बँक धारक याची खातरजमा करा.(MPC News Special) आपण गुंतवणूक करत असलेला व्यवसाय भारतात मान्यताप्राप्त आहे का, त्याला कायद्याचे संरक्षण आहे का, आपण गुंतवणूक करताना संस्था अथवा व्यक्तीसोबत सामंजस्य करार केला आहे का. केला असेल तर त्यातील अटी आणि शर्ती बारकाईने पाहणे आवश्यक आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.