Talegaon News : एमआरआय मशीन कोट्यावधी फसवणूक प्रकरणाचा फेरतपास ; पोलीस आयुक्तांचे तळेगाव दाभाडे पोलिसांना आदेश

एमपीसी न्यूज -एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने एका कंपनीच्या संचालकांनी तळेगाव येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र, तत्कालीन तपास अधिका-यांमुळे डॉ. डांगे यांना न्याय मिळाला नाही. याबाबतची तक्रार डॉ. डांगे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे केली.

दरम्यान, या प्रकरणाचा फेरतपास करावा तसेच तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांचा कसुरी अहवाल घेण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. डॉ. श्रीहरी डांगे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आहे. डॉ. श्रीहरी डांगे यांनी रविवारी (दि.08) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक व अॅड. रोहित राजगुरव उपस्थित होते.

डॉ. श्रीहरी डांगे म्हणाले, मी व्यवसायाने डॉक्टर असून तळेगाव दाभाडे येथे माझी पत्नी डॉ. सुचिता डांगे यांच्या समवेत श्री डायग्नोस्टिक सेंटर चालवतो. आम्हाला एमआरआय मशीनची गरज असल्याने ‘मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीला सन 2014-15 साली संपर्क केला. कंपनीने एमआरआय मशीनचे कोटेशन पाठवले आणि दोन कोटी चार लाख रुपये आगाऊ मागितले.

आम्ही सर्व रक्कम आगाऊ दिली, तरीही मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीचे भागीदार तुलसी पितांबर दास मनेक, नीरव हसमुखराय पंचमाटिया, जर्नल सिंग प्रेमसिंग बावा, इम्तियाज अकबर अली पोरबंदरवाला, डॉ. मेघा निरव पंचमाटिया (सर्व रा. मुंबई) यांनी एमआरआय मशीन पाठवली नाही.

आम्ही चौकशी केली असता सर्व भागीदार मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) ही कंपनी अन्य व्यक्तीला विकून पसार झाले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने आरोपींकडे पैसे मागितले. त्यातील भागीदार जर्नलसिंग प्रेमसिंग बावा याने मला जीवे मारण्याची धमकी दिली, असे डॉ. श्रीहरी डांगे म्हणाले.

डॉ. श्रीहरी डांगे पुढे म्हणाले, मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग कंपनीच्या संचालकांनी माझी एक कोटी आठ लाख 78 हजार 660 रुपयांची फसवणूक केली. यात माझे आर्थिक व मानसिक नुकसान झाले. कंपनीच्या संचालकांनी माझे जगणे मुश्कील केले. याप्रकरणी सन 2018 मध्ये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांनी प्रकरणाचा सखोल तपास केला नाही.

माझी दिशाभूल करून गुन्ह्याची कागदपत्रे ‘क समरी’ मंजुरीसाठी न्यायालयात सादर केली. ही ‘क समरी’ आम्हाला मंजूर नाही. त्यामुळे गुन्ह्याचा पुन्हा तपास व्हावा, यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे, मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. अखेर या प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.’ आमच्या पाठपुराव्याला यश आल्याचे डॉ. डांगे म्हणाले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना या गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. डांगे यांच्या फसवणुकीचा गुन्हा पुन्हा तपासावर घेण्यासाठी न्यायालयात पत्रव्यवहार करावा. गुन्ह्याची सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करावीत. डॉ. डांगे यांचा पुरवणी जबाब घेऊन या गुन्ह्याचा पुन्हा तपास करावा, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला नाही. डॉ. डांगे यांची दिशाभूल करून या गुन्ह्याची कागदपत्रे ‘क समरी’ मंजुरीसाठी न्यायालयात सादर केली. त्यामुळे तपास अधिकारी बाजगिरे यांचा याबाबत खुलासा घेऊन कसुरी अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्याचे देखील आयुक्तांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.