Mumbai News: बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत पुन्हा 21 डिसेंबरला सुनावणी

एमपीसी न्यूज – बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुक घेण्याच्या विरोधातील याचिकेवर आज (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी ठेवली असल्याचे अ‍ॅड.असीम सरोदे यांनी सांगितले असल्याचे याचिकाकर्ते, तन्मय कानिटकर, मारुती भापकर यांनी एमपीसी न्यूजला कळविले.

महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग असणे चुकीचे आहे असे आक्षेप घेणाऱ्या याचिकांमध्ये आज राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हजर झाले. एक प्रभाग व तीन उमेदवार असणे किंवा केवळ मुंबईत एक प्रभाग एक उमेदवार असणे ही बाब घटनाबाह्य नाही असे मत त्यांनी उच्च न्यायालयात मांडले. अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी किरण कदम विरुद्ध महाराष्ट्र सरकार या 2019 साली झालेला खंडपीठाच्या निर्णयाचा हवाला देऊन या याचिका टिकाऊ ठरू शकत नाही असे मत न्यायपीठासमोर मांडल्याची अॅड. सरोदे यांनी सांगितल्याचे भापकर म्हणाले.

सुरवातीला परिवर्तनचे तन्मय कानिटकर व मारुती भापकर यांच्या दोनच याचिका यासंदर्भात दाखल झाल्या होत्या. आता एकूण चार याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू आहे. यावरूनच हा नागरिहक्कांचा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीबाबतचे न्यायनिर्णय देतांना ज्या काही संविधानिक बाबी न्यायालयासमोर आल्या नाहीत. त्या आम्ही मांडणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे अ‍ॅड.असीम सरोदे यांनी न्यायालयात सांगितले.

वॉर्ड सभा घेण्याची प्रक्रिया नसेल तर सामान्य नागरिकांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग नष्ट होतो. हे वास्तव न्यायालय लक्षात घेईल असा विश्वास याचिकाकर्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग प्रतिवादी असलेल्या या याचिकांची सुनावणी दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी ठेवण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नासिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर येथील होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांवर परिणाम करणारी ही याचिका येणाऱ्या सुनावणी दरम्यान अंतिम सुनावणी होऊन निर्णायक ठरेल अशी शक्यता आहे. अ‍ॅड.असीम सरोदे यांच्यासोबत सहकारी वकील म्हणून अ‍ॅड. अजिंक्य उडाने,अ‍ॅड अजीत देशपांडे,अ‍ॅड अक्षय देसाई काम बघत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.