Mumbai : राज्यभरात आडकलेल्याना स्वगृही सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या 10 हजार बसेस धावणार -विजय वडेट्टीवार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, मजूर आणि इतरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी गुरुवारपासून ( दि.7) महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसेस धावतील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाच्या 10 हजार बसेसच्या मार्फत राज्यभरामध्ये लोकांना त्यांच्या गावी वा तालुक्याला मोफत सोडलं जाईल. यासाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा खर्च आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन विभाग करणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा मोफत असेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

या प्रक्रियेला 7 मेपासून सुरुवात होणार असून, त्यासाठीची आखणी आणि तयारी सध्या सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय. कोरोनासाठीच्या सगळ्या नियमांचं पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाईल.

राज्यातील मुंबई-पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गलेले लोक असतील या सर्वच लोकांना पुढील चार पाच दिवसात त्यांच्या स्वजिल्हयात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लक्ष घालून विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

मुख्यंमत्र्यांनी मदत व पुनवर्सन विभागाला कोणत्याही प्रकारे प्रवाशांना तिकीटांचा भुर्दंड पडणार नाही अशा उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार एसटी महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना घरी सोडण्यासाठी परिवहन मंडळाच्या दहा हजार बसेस तयार आहेत व यासाठी आरक्षण करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल विचार चालू आहेत.

राज्य शासन परिवहन महामंडळ संकेतस्थळ तसेच मोबाईलच्या माध्यमातून आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या विचार करत आहे तसेच प्रवाशांकडून किती प्रमाणात भाडे आकाराचे अथवा नाही? याबद्दल सुद्धा विचार चालू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.