Pimpri news : छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनासाठी महापालिकेतर्फे तुळापूर ग्रामपंचायतीकडे तीन लाखांचा धनादेश सुपूर्द

माजी नगरसेवक विकास डोळस यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ आहे. प्रतिवर्षी फाल्गून आमावस्येला बलिदान दिन अर्थात पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 2 लाख 99 हजार रुपयांचा धनादेश तुळापूर ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला. यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक विकास डोळस यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी तुळापूरच्या सरपंच गुंफाताई इंगळे यांच्याकडे बुधवारी (दि.30) धनादेश सुपूर्द केला. माजी नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश इंगळे यावेळी उपस्थित होते. तुळापूर येथील ग्रामस्थांनी दीड वर्षांपूर्वी आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. आमदार लांडगे यांनी ही जबाबदारी नगरसेवक विकास डोळस यांच्यावर सोपविली. त्यानुसार विकास डोळस यांनी पाठपुरावा सुरु केला.

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करताना सुविधा उपलब्ध करण्याबाबत निधीअभावी अडचणी येत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायतला प्रतिवर्षी मदत करावी, अशी आग्रही मागणी तत्कालीन नगरसेवक डोळस यांनी सर्वसाधारण सभेत केली. पुण्यतिथीदिनी समाधी स्थळाचे ठिकाणी मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, हार-फुले इत्यादी करिता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तीन लाख रुपये प्रतिवर्षी देण्याच्या ठराव 20 जानेवारी 2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करुन घेतला.

विकास डोळस म्हणाले, ”महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर झाला. परंतु, हेड उपलब्ध नव्हते. त्यामुळे मागीलवर्षी निधी देता आला नाही. हेड निर्माण करण्यासाठी स्थायी समितीकडे पाठपुरावा केला. नवीन हेड निर्माण केले. नवीन हेडमधून मदतनिधी देण्यात आला. बलिदानदिनाच्या पूर्वी 2 लाख 99 हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीकडे बुधवारी सुपूर्द केला”.

सरपंच गुंफाताई इंगळे म्हणाल्या की, ”स्व. अण्णासाहेब मगर यांनी पूर्वी बलिदान दिन आणि पुण्यतिथी साजरी करण्याबाबत मदत करण्याची सुरूवात केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा भाग हवेली तालुक्यात येतो. छत्रपती संभाजी महाराज देशवासीयांच्या अस्मितेचा विषय आहे. जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख रुपयांचा निधी मिळतो. मात्र, पुण्यतिथी दिनी तुळापूर येथे सुमारे दीड लाख शिवप्रेमी येत असतात. त्यांना जेवन, मंडप, स्वच्छतागृह, लाईट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडतो. आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक विकास डोळस यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड महापालिकेने निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ महापालिका, आमदार लांडगे, डोळस यांचे आभार मानतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.