Daund News : ऊस तोडण्यासाठी शेतात न आल्यामुळे शेतमालकाकडून कामगाराचा खून

एमपीसी न्यूज : ऊस तोडणी करण्यासाठी शेतात का आले नाहीत अशी विचारणा करीत शेतमालक आणि त्यांच्या दोन मुलांनी ऊस तोड कामगाराला लोखंडी गज आणि लाकडाने बेदम मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात मृत्यू झालाय. दौंड तालुक्यातील काळेवाडी गावात 11 जानेवारीला हा प्रकार घडला. 

सुनील सत्यनारायण उर्फ गुलाब शर्मा असे मृत्युमुखी पडलेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणी घनशाम भोसले, भागवत भोसले, सौरभ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत व्यक्तीचा नातेवाईक भट्टा ब्राह्मणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत सुनील शर्मा आणि त्याचे नातेवाईक आरोपीच्या शेतातील ऊस तोडणीसाठी आले होते. शेताजवळ बांधलेल्या एका खोपीत राहत होते. 11 जानेवारी रोजी ऊस तोडणी साठी हे सर्व कामगार आले नाही म्हणून वरील आरोपींनी त्यांना लोखंडी गजाने आणि लाकडाने बेदम मारहाण केली. यामधील सुनील शर्मा हा गंभीर जखमी झाला होता. अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना 12 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.