Nigdi : दारू पिण्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्याने वार; मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज – मुलगा दारू पिऊन आल्याने वडिलांनी त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या मुलाने वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने मारले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री यमुनानगर निगडी येथे घडली.

मारुती लक्ष्‍मण कोळी (वय 46, रा. यमुनानगर, निगडी) असे जखमी वडिलांचे नाव आहे. त्यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विलास मारुती कोळी (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शुक्रवारी रात्री दारू पिऊन घरी आला. याबाबत जखमी वडील मारुती यांनी त्याला ‘दारू पिऊन का आला’ असे विचारले. यावरून चिडलेल्या विलास याने वडिलांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये मारुती यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी विलास याने घरासमोर पडलेला दगड मारुती यांच्या नाकावर मारून आणखी जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.