Nigdi News : बचत गटातील महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बचत गटातील महिलांना फायनान्स कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेऊन आठ लाख 65 हजार 490 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2021 ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्वाभिमानी फायनान्स, आकुर्डी येथे घडला.

अभिजीत प्रकाश दाभाडे (वय 44, रा. नवनाथ चौक, आकुर्डी) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. 24) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास रघुनाथ बांदल (रा. नऱ्हे आंबेगाव, पुणे, मुळगाव अंधेरी वेस्ट, मुंबई), विलास वामन पाटील (रा. खराळवाडी, कामगार नगर, पिंपरी, मूळ रा. सुरे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती कार्पोरेशन अँड जीवन संजीवन ग्रुपचे संचालक आरोपी विकास बांदल व अकाउंट मॅनेजर विलास पाटील यांनी फिर्यादीला त्यांच्या स्वाभिमानी फायनान्स मार्फत आठ महिला बचत गटांमधील 80 महिलांना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले. खोटे आश्वासन देऊन प्रत्येक महिला बचत गटातील महिलांकडून 46 हजार 800 रुपये घेतले. आठ बचत गटातील महिलांकडून एकूण तीन लाख 74 हजार 400 रुपये घेतले.

21 वैयक्तिक कर्जदारांना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण एक लाख पाच हजार रुपये घेतले. त्या 21 मधील 7 कर्जदारांकडून पुढील कर्ज मंजुरीच्या प्रोसेससाठी एकूण तीन लाख 80 हजार 90 रुपये घेतले. संपूर्ण प्रकरणात आरोपींनी एकूण आठ लाख 65 हजार 490 रुपये घेतले.

फिर्यादी व महिला बचत गटांमधील महिलांची मूळ रक्कम तसेच कर्जाची रक्कम न देता या रकमेचा आरोपींनी अपहार केला. फिर्यादी व महिला बचत गटांतील कर्जदारांची आरोपींनी आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.