Nigdi : यमुनानगरमध्ये घरफोडी करून साडेचार लाखांचा ऐवज पळवला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरातून सुमारे 4 लाख 43 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी साडेचारच्या सुमारास दत्त मंदिराजवळ यमुनानगर येथे उघडकीस आली.

सागर रमेश जंगम (वय 33, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी सागर यांचे घर गुरुवार (दि. 21) ते रविवार (दि. 24) या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला.

पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरुमच्या जिन्या खालील लोखंडी कपाटाचे आणि बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी दोन्ही कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 43 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.