Pune News : भारतातील पहिल्या अतिउच्च क्षमतेच्या काँक्रीट प्रकल्पाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – प्रामुख्याने पुलाच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या अतिउच्च क्षमतेच्या काँक्रीट प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 26) पुण्यात झाले.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी केवळ बांधकाम क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात यापुढील काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पुलाच्या बांधकामाचा खर्च एका बाजूला कमी होणार असून गुणवत्ता मात्र वाढणार असल्याचेही गडकरी म्हणाले .या अति उच्च क्षमतेच्या काँक्रीटमध्ये फायबरचा वापर केला गेला असल्याने ते वजनाला हलके बनले असून त्याचे आयुष्य किमान दीडशे वर्षापर्यंत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पुण्यातील पायाभूत सुविधा विकास कंपनी SDPL-UHPC INDA LLP ने हे तंत्रज्ञान भारतात आणले आहे. कंपनीने किवळे, पुणे येथे ही भारतातील पहिली UHPC उत्पादन सुविधा स्वदेशी विकसित केली आहे. भारतातील पहिला दीर्घ कालावधीचा UHPFRC पूल SDPL-UHPC INDIA कंपनीने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि सध्या या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे इतर विविध प्रकल्प कार्यान्वित आहेत.

पायाभूत सुविधा क्षेत्रात या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे अधिक टिकाऊ संरचना, जलद बांधकामे आणि किफायतशीर उपायांसह प्रभावी पायाभूत सुविधा विकासाच्या भारत सरकारच्या ध्येय आणि दृष्टीला चालना मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.