Pimpri News : घरकुल सारख्या परिसरात कोविड लसीसाठी ऑनलाईन नोंदणीचा अट्टाहास नको

भाजप शहर उपाध्यक्ष अजय पाताडे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात कोविड लसीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केल्याने चिखली मधील घरकुल सारख्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या भागामध्ये खूप मोठी लोकवस्ती आहे.

 

या भागात प्रशासनाने योग्य नियोजन करून जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल हा प्रयत्न केला पाहिजे. इथल्या सर्व नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होणार नाही त्यामुळे अशा भागांमध्ये ऑनलाईन नोंदणीचा हट्ट नसावा, अशी मागणी भाजप शहर उपाध्यक्ष अजय पाताडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

अजय पाताडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड लसीकरण शहरामध्ये आजपर्यंत सुरळीत सुरू होते. अचानक सर्व केंद्रावर ऑनलाइन नोंदणी आवश्यक केल्याने शहरातील घरकुल सारख्या भागामध्ये काही नागरिक लसीपासून वंचित आहेत. मागील दोन दिवस या भागामध्ये होत असलेले लसीकरण हे स्थानिकांना न मिळता बाहेरून ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना होत आहे.

स्थानिक नागरिक रोज सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहतात. दहा वाजता ऑफिस उघडल्यानंतर त्यांना घरी पाठवले जाते. आज पर्यंत ह्या भागामध्ये होत असलेले लसीकरण हे स्थानिक प्रशासकीय कर्मचारी व त्या भागातील स्वयंसेवक यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले आहे. मात्र अचानक प्रशासनाने बदललेल्या निर्णयामुळे नियोजन विस्कळीत झाले आहे.

या बाबत त्वरित योग्य नियोजन करून घरकुल वसाहतीतील सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा स्थानिकांचा उद्रेक होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.