Navratri 2021: लक्ष्मीमातेस 25 किलोची चांदीची साडी अर्पण

एमपीसी न्यूज – 27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचा प्रारंभ गुरुवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापनेने करण्यात आला. दाक्षिणात्य पद्धतीचे हे श्री लक्ष्मीमातेचे मंदिर झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच आकर्षक रंगीत दिव्यांच्या माळांची देखील त्यात भर पडली होती. मंदिराच्या सार्‍या परिसरात पहाटे पाण्याचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठीक सकाळी 7.30 वाजता पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक आयोजक व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल व महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल यांनी देवीची विधीवत पूजा करून घटस्थापना केली. याचे पौराहित्य वेदमूर्ती पं. शर्मा गुरुजी यांनी केले.

यावेळी बागुल कुटुंबीयांतर्फे 25 किलो चांदीची साडी देवीस अर्पण करण्यात आली. या चांदीच्या साडीवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले असून, अनेक ठिकाणी आकर्षक रंगीत खडे लावण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोराचा पिसारादेखील चित्रित करण्यात आला आहे. या चांदीच्या साडीच्या काही भागावर सोन्याचा मुलामाही देण्यात आला आहे.

शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरातील ही श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती साडेपाच फूट उंचीची आहे. यास सोन्याच्या अलंकारांनी सजवले आहे. आबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांनी घटस्थापना केल्यानंतर 25 किलो चांदीची साडी देवीला अर्पण करून ‘माता माता की जय’च्या गजरात साडी देवीला नेसवली. या साडीला आतल्या बाजूने मखमल लावण्यात आली असून, पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या कारागिरांनी सहा महिने खपून ही साडी तयार केली आहे, असे कपिल बागुल व हेमंत बागुल यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मंदिरे आज खुली झाल्यानंतर अन्य मंदिरांप्रमाणेच शिवदर्शनच्या श्री लक्ष्मीमाता मंदिरातही भाविकांनी गर्दी केली. त्यात महिलांची संख्या मोठी होती. प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे असे सांगत ज्यांनी मास्क लावला नाही त्यांना कार्यकर्ते मास्क देत होते. तसेच सॅनिटायझरचाही वापर होत होता. गर्दी न करता सुरक्षित अंतर राखून देवीचे दर्शन घेतले जात होते.

दीर्घ कालावधीनंतर देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले त्यामुळे आलेले सर्व भाविक, देवीभक्त अतिशय आनंदले होते. ‘करोनाचे संकट लवकर कायमचे दूर होवो’ अशीच भावना यावेळी प्रत्येक जण व्यक्त करीत होता. तसेच देवीच्या चांदीच्या साडीचेही कौतुक केले जात होते.

यंदादेखील पुणे नवरात्रौ महोत्सवात करोना परिस्थितीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जाणार नसले, तरी पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न होणार आहे. त्यामध्ये शुक्रवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार भवन (कमिन्स हॉल), नवी पेठ, पुणे येथे श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.

बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित निर्मला गोगटे व डॉ. रेवा नातू, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, वेदमूर्ती पं. श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना यंदा या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. देवीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार भूषविणार असून, शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नियमांच्या अधीन राहून हा कार्यक्रम संपन्न होईल, असे या महोत्सवाचे संस्थापक आयोजक आबा बागुल यांनी सांगितलेे. या वेळी नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल हे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवातील कार्यक्रमांचे इव्हेंट कोऑर्डिनेशन सुनील महाजन व निकिता मोघे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.