Wakad Crime News : जादूटोणा करण्याची भिती दाखवून महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबाला बेड्या

एमपीसी न्यूज – महिलेवर जादूटोणा करून त्यांना कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला असता वाकड पोलिसांनी सापळा लावून बीड जिल्ह्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या.

विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज (वय 41, रा. मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, विलास पवार उर्फ महाराज याने महिलेला फोन केला. महिलेला कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तिच्या पतीने सांगितले असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले. महिलेच्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्यांचे आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून आरोपीने महिलेका वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे. त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करू शकणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लिल व्हिडिओ पाठवून त्यात उजव्या हातावरील तीळ व गुप्तांगावरचे तीळ दाखवले. व्हीडीओ पाठविल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

तसेच फिर्यादीला माझेशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील. तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करून पीडीत महिलेचा विनयभंग केला.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 292, 500, 509 माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ए), नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलिसांनी फिर्यादी महीलेच्या मदतीने 25 डिसेंबर रोजी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा लावला. आरोपी डांगे चौकात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, दिपक साबळे, दिपक भोसले, भास्कर भारती, कल्पेश पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.