Pimpri News : महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव तातडीने खुले करा – अजित गव्हाणे

महापालिका शाळांचीही सुधारणा करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव दुरुस्ती अथवा इतर कारणांनी बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तीव्र उष्णता असूनही लोकांना पोहोण्याचा आनंद घेता येत नाही. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव तातडीने पूर्णक्षमतेने आणि पूर्ण वेळ सुरु करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली तसेच दोन वर्षे बंद असल्याने महापालिका शाळांची, दुरावस्था झाली आहे. उन्हाळी सुट्टीत शाळांची सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे की, महापालिकेडून जलतरण तलावाची निर्मिती केली आहे. पण, महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव दुरुस्तीसह इतर कारणांसाठी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एप्रिल महिन्यात प्रचंड उष्णता, उकाडा आहे. आणखी मे महिना जायचा आहे. जलतरण तलाव बंद असल्याने लहान मुले, नागरिकांना पोहोण्याचा आनंद घेता येत नाही. महापालिकेने तलावांवर सार्वजनिक मालमत्ता म्हणून गुंतवणूक केली आहे. नागरिकांना, मुलांना पोहोण्याचा लाभ घेता यावा यासाठी नादुरुस्त तलाव तातडीने दुरुस्त करावेत. तातडीने उपाययोजना करुन तलाव पूर्णवेळ खुले करावेत.

महापालिका शाळांची सुधारणा करा

कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद होत्या. सुमारे दोन वर्षे शाळा बंदच राहिल्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनापश्चात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शाळा, कार्यालये पुन्हा खुली करण्यात येत आहेत. दोन वर्षे वापराअभावी शाळांमधील स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, वर्ग खोल्यातील काही भाग, खेळाचे साहित्य खराब झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील शाळांची पडझड, दुरावस्था झाली आहे. याबाबत पालकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. शाळांच्या झालेल्या दुरावस्थेत मुलांना शिक्षण देणे धोकादायक आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व शाळांचे निरीक्षण करुन सुधारणा कराव्यात, अशी महत्वपूर्ण मागणीही गव्हाणे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.