YCMH News : नर्सिंग कॉलेजसह पॅरामेडीकल कोर्सेस, 705 कर्मचारी उपलब्ध होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील पदव्युत्तर संस्थेत बीएससी नर्सिंग कॉलेज आणि पॅरामेडीकल कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. या कॉलेजमधून वायसीएम रूग्णालयाला चार वर्षात 240 नर्सिंग आणि 465 पॅरामेडीकल असे 705 कर्मचा-यांचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय महापालिकेला यातून वार्षिक साडेतीन कोटी उत्पन्नही मिळू शकणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात 7 मार्च 2019 या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. 15 विषयांच्या मान्यतेचा प्रस्ताव दिल्लीतील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 9 विषयांना मान्यता मिळाली आहे. उर्वरीत सहा पदव्युत्तर वैद्यकीय विषयांना परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वायसीएम रूग्णालयातील पदव्युत्तर संस्थेत नवीन 11 मजली इमारतीत बीएससी नर्सिंग कॉलेज आणि पॅरामेडीकल कोर्सेस सुरू करण्याची बाब महापालिकेच्या विचाराधीन होती.

त्याअनुषंगाने 1 सप्टेंबर 2021 रोजी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत नवीन 11 मजली इमारतीत तिस-या व चौथ्या मजल्यावर जागा निश्चित करून बीएससी नर्सिंग कॉलेज आणि पॅरामेडीकल कोर्सेस सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यासाठी दोन्ही कोर्सेससाठी काही पायाभुत सुविधा, तज्ञ मनुष्यबळ, अर्हताधारक प्राध्यापकांची आवश्यकता लागणार आहे.

बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यावर वायसीएम रूग्णालयास आणि महापालिकेच्या इतर रूगणालयास मनुष्यबळ प्राप्त होणार आहे. गरजूंना रोजगराच्या संधीही यातून निर्माण होणार आहेत. कोरोना प्रादूर्भाव कालावधीत वायसीएम आणि इतर महापालिका रुग्णालयांमध्ये नर्सिंग स्टाफची कमतरता भासली होती. ही कमतरता काही प्रमाणात कमी करण्यासाठी पुण्यातील शासकीय बीजे वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालयाच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

वायसीएम रूग्णालय नर्सिंग कॉलेजमध्ये 70, विविध पॅरामेडीकल अभ्यासक्रमामध्ये 125 आणि पीजीडीएमएलटी अभ्यासक्रमामध्ये 20 विद्यार्थी क्षमता प्रस्तावित आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जी प्रक्रीया अवलंबण्यात आली, तशीच प्रक्रीया बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी केली जाणार आहे. पॅरामेडीकल अभ्यासक्रमासाठी कोणतीही अतिरिक्त पायाभुत सुविधा निर्माण करणे आवश्यक असणार नाही.

तसेच कोणताही अतिरिक्त कर्मचारी आवश्यक असणार नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या पदव्युत्तर विभागाअंतर्गत वैद्यकीय प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम सुरू करता येण्यासारखा आहे. या अभ्यासक्रमाच्या 19 कोर्सेसपैकी 11 प्रकारचे अभ्यासक्रम यात समाविष्ट करता येण्यासारखे आहेत. प्रत्येक विषयासाठी अध्यापकांची नेमणूक करून त्यांना प्रति तासाकरिता पदवी किंवा पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 22 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्णयानुसार 750 रूपये आणि प्रात्यक्षिकांसाठी 300 रूपये द्यावे लागणार आहे.

हे कोर्स सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात प्रतिवर्षे 93 लाख 5 हजार रूपये भर पडणार आहे. हे कॉलेज आणि कोर्स सुरू करण्यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला प्रत्येक कोर्ससाठी संलग्नीकरण, संलग्नीकरणाचे नुतनीकरण व विस्तारीकरण या प्रक्रीयेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये सुरूवातीचे शुल्क, संलग्नीकरण आणि संलग्नीकरणाचे नुतनीकरण यानुसार बीएससी पीएमटी 10 कोर्ससाठी 11 लाख रूपये, पीजीडीएमएलटी कोर्ससाठी 2 लाख 50 हजार रूपये आणि बीएससी नर्सिंगसाठी 19 लाख रूपये अशा एकूण 32 लाख 50 हजार रूपये शुल्काचा समावेश आहे.

कॉलेज आणि कोर्सेस सुरू झाल्यापासून अंदाजे पहिल्या ते चौथ्या वर्षापासून महापालिकेस वार्षिक उत्पन्न 3 कोटी 59 लाख 84 हजार रूपये मिळू शकेल. तसेच वार्षिक संभाव्य खर्च 3 कोटी 46 लाख 10 हजार रूपये असणार आहे. याशिवाय रूग्णालयाला 240 नर्सिंग आणि 465 पॅरामेडीकल असे एकूण 705 कर्मचा-यांचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

हे होणार लाभ!

  • 24 तास मनुष्यबळ उपलब्धतेमुळे भविष्यात कोरोना सदृश्य अत्यंत बिकट परिस्थितीचा समर्थपणे सामना करणे शक्य होईल.
  • अपु-या तज्ञ मनुष्यबळाअभावी बाहेर संदर्भित होणा-या रूग्णांची संख्या कमी होईल.
  • नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल.
  • रूग्णसेवेचा दर्जा उंचावेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.