PCMC Breaking News : नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी तातडीने स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC Breaking News) नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी आज (शुक्रवारी) तातडीने पदभार स्वीकारला. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश आला होता. त्यानंतर आज महापालिकेत दाखल होत जांभळे-पाटील यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेऊन अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे यांची 13 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली होती. त्यांच्या जागी महापालिकेतच सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि आता उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पण, झगडे यांच्या नियुक्तीला राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपचे शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे नियुक्तीचा आदेश येवूनही झगडे यांना नऊ दिवस अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार आयुक्तांनी दिला नव्हता.
अखेरीस गुरुवारी सायंकाळी झगडे यांची (PCMC Breaking News) अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द झाल्याचा शासन आदेश महापालिकेत धडकला. त्यांच्या जागी राज्यकर विभागाचे आणि वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. गुरुवारी नियुक्ती होताच जांभळे-पाटील आज शुक्रवारी तातडीने दुपारी महापालिकेत दाखल झाले. रूजू अहवाल आयुक्तांकडे पाठविला आणि आयुक्तांनी अहवालावर स्वाक्षरी केली. त्यानंतर जांभळे-पाटील यांनी दालनात जाऊन अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.