PCMC : ‘शिल्पांना’ सत्ताबदलाचा फटका; उद्‌घाटन रखडले!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी चौकांमध्ये टाकाऊ वस्तूंपासून सुंदर शिल्प उभारण्यात आले आहेत. शहरातील चौकांमध्ये उभारलेल्या या शिल्पांचे जून महिन्यामध्ये उद्‌घाटन करण्यात येणार होते. मात्र विधानपरिषदेची निवडणूक आणि त्यानंतर झालेले सत्ता बदल यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे सध्या चौकातील हे शिल्प उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरामध्ये वेळोवेळी अतिक्रमण कारवाई केली जाते. या कारवाईतून जमा केलेले साहित्य नेहरूनगरच्या गोदामात जमा केले जाते. त्या भंगार साहित्यामधून नवीन कलाकृती तयार करण्याची संकल्पना तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी राबविली होती. या साहित्यातून 15 कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. शहरातील महत्वाच्या विविध 15 चौकात त्या कलाकृती बसवण्यात आल्या. या प्रत्येक शिल्पासाठी महापालिकेने अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च केला आहे. या शिल्पांचे आयुर्मान हे किमान 20 वर्ष असेल असा दावा प्रशासनाने केला आहे.

Pune Ganpati Visarjan 2022 : अखेर 29 तासांनी संपली विसर्जन मिरवणूक

दरम्यान, या शिल्पांचे उद्‌घाटन जून महिन्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला होता. त्यानंतर राज्यामध्ये सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस यांची सत्ता आली. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाली. त्यामुळे हा उद्‌घाटनाचा (PCMC) कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

राज्यातील सत्ता बदलानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप झाले. मात्र, प्रत्येक जिल्ह्यांना पालकमंत्री अद्याप जाहीर झाले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला पालकमंत्री मिळाल्याशिवाय महापालिकेने 15 चौकात उभारलेल्या शिल्पांचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता कमीच आहे.

कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, ”या शिल्पांचे उद्‌घाटन करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते रद्द करावे लागले. आता शिल्पाच्या सभोवती देखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर उद्‌घाटन करून त्या शिल्पांचे लोकार्पण करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.