Pimpri News: पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपची ‘डीजीटल टेक्नोलॉजी अवॉर्ड’ पुरस्कारासाठी निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने विकसित केलेल्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपची एकात्मिक संवाद या श्रेणीमध्ये ‘डीजीटल टेक्नोलॉजी सभा अवॉर्ड 2021’ या पुरस्कारासाठी निवड झाली. शहराच्या नावलौकिकात भर घालणारी ही बाब आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

इंडीयन एक्सप्रेस समूह आणि एक्सप्रेस कॉम्प्युटर यांच्या वतीने विविध राज्यामधील ई गव्हर्नन्स क्षेत्रातील वैचारीक नेतृत्व व तंत्रज्ञानाचा वापर करणा-या संस्थांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. महापालिकेच्या स्मार्ट सारथी अॅप साठी ह्या पुरस्काराची निवड पीसीएमसी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त राजेश पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत करण्यात आली.  त्यानंतर महापौर माई ढोरे यांनी आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण व स्मार्ट सारथी अॅपच्या चमूचे विशेष अभिनंदन केले.

ई-गव्हर्नन्सच्या कक्षा रुंदावण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन स्वत: पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असतात.  कोरोना साथीच्या काळात केंद्र शासन आणि विविध राज्य शासनाच्या प्रशासनाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक उपक्रम राबविले.  पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने व महानगरपालिकेनेही स्मार्ट सारथी अॅप सारखे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरीकांपर्यंत सेवा सुविधा दिल्या.  ई-गव्हर्नन्सचा वापर वाढावा यासाठी अथकपणे प्रयत्नशील असणा-या शासनामधील वैचारीक नेतृत्वाचा एक्सप्रेस कॉम्प्युटर कडून सन्मान करीत येत असतो.

समाजातील विविध घटकांच्या हितार्थ एखादे विशिष्ट तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या समुच्चयाचा नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करणारे शासकीय विभाग, एजन्सी  किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहणे, कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करणे, ग्राहक किंवा भागीदार यांना अधिक चांगला प्रतिसाद देणे यासाठी पूर्णतः नवीन प्रणाली विकसित करणे किंवा सध्या अस्तित्त्वात असलेल्या तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण पद्धतीने वापर करणे या सर्वांचा या पुरस्कारांशी संबंधित बाबींमध्ये समावेश होतो.

एक्स्प्रेस कॉम्प्यूटर हा भारताच्या आयटी आणि माध्यम क्षेत्रातील एक नामांकित ब्रँड आहे. ही संस्था गेल्या 29 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या पुरस्कारासाठी शासकीय विभाग, एजन्सीज किंवा संस्था यांच्याकडून विविध तांत्रिक श्रेणींमध्ये अर्ज मागविण्यात आले. या अर्जांची छाननी करून एक्सप्रेस कॉम्प्युटर टीमच्या तज्ञ संपादक मंडळाकडून त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप ची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत.  तसेच शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. डिजिटल टेक्नोलॉजी सभा अवॉर्ड 2021 म्हणजे नागरिकांकडून या कामाची मिळालेली पावतीच आहे, असे मत महापौर ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.