Petrol Diesel to get Cheaper : दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत लक्षणीय घसरण; केंद्र सरकारकडून खास दिवाळी भेट

एमपीसी न्यूज – एकीकडे दिवसेंदिवस पेट्रोल – डिझेल च्या वाढत्या किमतीने सामान्यांचा जीव मेटाकुटीला आला असतानाच केंद्र सरकारने इंधनावरचा एक्साईज टॅक्स कमी करून मोठा दिलासा दिला आहे. यामुळे पेट्रोल – डिझेलच्या किमती मोठ्या फरकाने कमी झाल्या आहेत.

एकीकडे महागाई आणि दुसरीकडे पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमती असे रोजच दिसणारे चित्र काहीसे बदलणार असून याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपयांनी तर डिझेलवरच्या एक्साईज टॅक्समध्ये 10 रुपयांची सूट दिल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होणार आहे.

ऐन दिवाळीत सरकारकडून सर्वसामान्यांसह सगळ्यांनाच एक प्रकारची ही दिवाळी भेट असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक ठरलेल्या या पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमतींचे दर उद्यापासून लागू होणार असे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कमी झालेल्या इंधन दराचा शेतकरी वर्गाला सुद्धा मोठा फायदा होणार आहे. शेतीचा रबी हंगाम सुरु होणार असून डिझेलवरच्या एक्साईज टॅक्सवर पेट्रोलच्या दुप्पट म्हणजे 10 रुपयांची सूट मिळणार असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

दरम्यान, राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरच्या VAT करात कपात करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे केंद्राने निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 घरबसल्या पाहा पेट्रोल – डिझेलचे दर –

तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर ‘IndianOil ONE Mobile App‘ तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा. तुम्हाला तात्काळ नजीकच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेता येतील.

तसेच, इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर सुद्धा https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.