Pimpri: भाजपमध्ये जवळच्या लोकांना तिकिटे देण्याची पद्धत रूढ झाली -चंद्रकांत पाटील

भाजपमध्ये आलेले नेते सत्तेसाठी आले होते का? हा चेक (तपासणी) करण्याचा काळ

एमपीसी न्यूज – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे एका कुटुंबाचे पक्ष आहेत. भाजपा ही पार्टी कोणा एकाची नाही. कार्यकर्त्यांची पार्टी आहे. परंतु, सध्या भाजपमध्ये जवळच्या लोकांना तिकिटे देण्याची पध्दत रूढ झाल्याचे मान्य करत त्याला सुरूंग लावण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच स्वतःच्या जवळच्या नव्हे तर पक्षाच्या जवळच्या लोकांना तिकिटे दिली पाहिजेत. योग्य काम करणाऱ्याला शाबासकी द्या. चुकीचे काम करणारा मग तो कोणत्याही पदावर असो त्याला शासन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपची संघटनात्मक बैठक आज (गुरुवारी) आकुर्डी येथे झाली आहे. या बैठकीत आमदार महेश लांडगे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. महापौर उषा ढोरे, माजी मंत्री विनोद तावडे, महिला अध्यक्षा माधवी नाईक, खासदार अमर साबळे, मावळते शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उमा खापरे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, रवी लांडगे, शैला मोळक, महेश कुलकर्णी आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

महेश लांडगे काट्याच्या खुर्चीवर बसले आहेत. पार्टी कोणा एकट्याची नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करावे. महापालिकेत आपली सत्ता आहे. दोन वर्षांनी महापालिकेची निवडणूक आहे. वार्ड पद्धतीने निवडणूक होणार आहे. समनव्याने सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे लागेल. महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन उपक्रम वाढवा. राज्यात घडणाऱ्या घटनांवर तत्काळ आंदोलने करा. प्रदेशच्या आदेशाची वाट बघू नका, अशा सूचना पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येईल हे स्वप्न पाहिले नव्हते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. 84 नगरसेवक निवडून आले. काही महिन्यासाठी भाजपचे सरकार घालविले असल्याचे मला स्वप्न पडले होते. कोण सत्तेसाठी आला आहे?, कोण आपला आहे? हे चेक करण्याचा आताचा काळ आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.