Pimpri News : पिंपरी-चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे उद्घाटन; राधा मंगेशकर यांची मैफल

एमपीसी न्यूज – कला, साहित्य, चित्रपट आदी सांस्कृतिक घटकांना एका धाग्यात गुंफण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड कल्चरल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून या फाऊंडेशनचे उद्घाटन प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. गायिका राधा मंगेशकर यांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत साहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे होते. खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, महापौर उषा ढोरे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नृत्यविशारद नंदकिशोर कपोते, पुरुषोत्तम पाटील, वनाधिक्षक रंगनाथ नाईकवडे, पांडुरंग दातार, डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. अमरसिंह निकम, उद्योजक शंकर जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, विजय भिसे, कुंदा भिसे, संजय भिसे, राजू भिसे आदी उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, दिवाळी पाडवा व जागतिक रंगभूमिदिन यानिमित्त पिंपरी-चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे उद्घाटन झाले, हा योगायोग आहे. जे स्थान पुण्यातील त्रिदल फाऊंडेशनला आणि नाशिकच्या कुसुमाग्रज फाऊंडेशनला आहे; ते स्थान पिंपरी-चिंचवड कल्चरल फाऊंडेशनने प्राप्त करावे. पिंपरी- चिंचवड शहराची स्वत;ची अशी वेगळी संस्कृती आहे. महाराष्ट्रातील विभिन्न भागातले लोक चरितार्थासाठी आपली आपली संस्कृती घेऊन इथे आले आहेत. या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम या फाऊंडेशनला करायचे आहे.

कीर्तन, तमाशा व कुस्ती या तिन्ही फडांना इथे चांगली दाद मिळत आली आहे. तसेच संतांच्या पालख्या या नगरीतून मार्गस्थ होतात. संतांच्या विचारांची वेगळी संस्कृती, अध्यात्माची वेगळी संस्कृती इथे आहे. तसेच लोकरंगभूमी, संगीतशास्त्र, नृत्य, नाट्य असा उत्कर्ष या शहरात झाला आहे. त्यामुळे राजकीय द्वैतासोबत सांस्कृतिक अद्वैताला सोबत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान फाऊंडेशनसमोर असणार आहे, असेही डॉ. देखणे यांनी सांगितले.

खासदार बारणे यांनी सांगितले, की या फाऊंडेशनच्या निमित्ताने शहराच्या सांस्कृतिक वैभवात निश्‍चित भर पडली आहे. शहराचे सांस्कृतिकीकरण करण्यात अनेक घटकांचा समावेश आहे. हे फाऊंडेशन शहरातील विविध कला घटक जोपासण्याचे काम निश्‍चित करेल, असा विश्‍वास आहे.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. पिंपरी-चिंचवड फाऊंडेशनच्या नावातच ‘पिंपरी-चिंचवड’ शब्द असल्याने शहराचा नावलौकिक जपण्याची मोठी जबाबदारी आहे. भविष्यात ही संस्था आपली वेगळी ओळख निर्माण करेल. देशातलं राहण्यायोग्य शहर घडवत असताना सांस्कृतिक शहर म्हणून हे शहर नावारुपाला येणे गरजेचे आहे. राजकीय बरोबरच सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.