Pimpri News: पिंपरी-चिंचवडकरांना 8 महिने पुरेल इतका पवना धरणात पाणीसाठा; पण, दिवसाआडच पाणीपुरवठा कायम

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून मावळ परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरातही पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे मागील तीन दिवसात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी धरणात 45.08 टक्के पाणीसाठा होता. आज 71.74 टक्के पाणीसाठा झाला असून पुढील 7 ते 8 महिने पुरेल इतका हा पाणीसाठा आहे. पण, तूर्तास दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे.

मागील काही दिवसांपासून धुवांधार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे वाहत आहे. त्यामुळे धरणातील येवा वाढत आहे. परिणामी, पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 18 जुलै रोजी पवना धरणात केवळ 35.80 टक्के पाणीसाठा होता. अवघ्या पाच दिवसात धरणातील पाणीसाठ्यात दुपट्टीने वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 71.74 टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी  7 ते 8 महिने पुरेल एवढे आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील येवा वाढत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असली. तरी, शहरवासीयांना एकदिवसाआडच पाणीपुरवठा सुरु आहे. नोव्हेंबर 2019 पासून शहरवासीय एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहे. वाढीव 30 एमएलडी पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याची भूमिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे धरण 100 टक्के भरले. तरी, नागरिकांना एकदिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पुढील 7 ते 8 महिने पुरेल एवढा पाणीसाठा – लडकत

महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, “पवना धरण परिसरात जोरदार पाऊस  पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. आजमितीला धरणात सुमारे 72 टक्के पाणीसाठा आहे. धरणातील येवा वाढत आहे. पिंपरी-चिंचवडकरांना महिन्याला 9 ते 10 टक्के पाणी लागते. त्यानुसार 72 टक्के पाणीसाठा पुढील 7 ते 8 महिने पुरेल. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल केला जाणार नाही. सध्या तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा कायम राहील”.

पवना धरणातील आजची पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = *120मि.मि.*

# 1 जूनपासून झालेला पाऊस = *1471मि.मि.*

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =       491
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = *71.74% टक्के*

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा =     34.96% टक्के*

#  गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 4.99% टक्के*

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *40.99% टक्के*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.