Pimpri News: जुनी सांगवी परिसरात भीषण अपघात, रस्त्यावर उभ्या असलेल्या 6 जणांना टँकरने उडवले

अपघातानंतर टँकर चालक पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

एमपीसी न्यूज- जुनी सांगवी परिसरात एका भरधाव टँकरने सहा जणांना उडवल्याची घटना घडली आहे. यात, दोघांची प्रकृती चिंताजनक असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

हा अपघात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी राधेश्याम बब्रुवान मुळे (वय 26, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल टँकर (एमएच 14 एचयू 6872) हा सांगवी फाटा येथून माकन चौक जुनी सांगवीच्या दिशेने भरधाव जात होता.

त्याचवेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरुन चालत जात असलेल्या व्यक्तींना धडक दिली. त्यानंतर टँकर एका इलेक्ट्रिक खांबाला जावून धडकला.

या अपघातातील सहा जखमींपैकी चौघांची ओळख पटली आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.