Pimpri News : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम भरणेस मुदतवाढ द्यावी – संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागामार्फत शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये घरे देण्यात येणार आहे सदर आवास योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम भरणेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागातर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे देण्यात येणार आहेत. त्यानुसार पात्र लाभार्थींना महापालिकेच्या झो.नि.पु विभागाकडून तसे पत्र देण्यात आले आहे. सुमारे सहा लाख,एकवीस हजार रुपये लाभार्थींना भरावे लागणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता सुमारे अडीच लाख रुपयांचा आहे.ते त्यांना पुढील दोन हप्त्यांमध्ये भरावयाचे आहे यासाठी लाभार्थींना राष्ट्रीयकृत बँक अथवा अन्य खाजगी,सहकारी बँकाकडून लोन घ्यावयाचे आहे.तसे पत्र लाभार्थींना दिले आहे.त्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

राष्ट्रीयकृत आणि अन्य बँका पात्र लाभार्थींना कर्ज घेण्यासाठी विविध कागदपत्रे आणावयास हेलपाटे मारायला लावत आहेत. पात्र लाभार्थी हे सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी आहेत.या नागरिकांमध्ये कोरोनामुळे काहींचे रोजगार गेले आहे तर काहीचे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना कागदपत्रे मिळविताना अडचणी येत आहेत. तरी कृपया आपण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता भरण्यासाठी सुमारे एक महिन्याची मुदतवाढ द्यावी तरच या गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होतील.त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम भरणेस मुदतवाढ द्यावी अशी आगृही मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.