Pimpri News: अर्थसंकल्पाच्या गैरहजरीबाबत आयुक्तांची सारवासारव 

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या अर्थसंकल्पालाच गैरहजर राहिल्यामुळे टीका होऊ लागल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत गैरहजेरीबाबत सारवासारव केली. माझ्या परिवारामध्ये लग्न होते. पंधरा दिवस आधीच त्यासाठी मी सुट्टी मंजूर करून घेतली होती. त्यातच 20 फेब्रुवारीच्या आधीच अर्थसंकल्प सादर करावा लागत असल्याचे 18 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित झाले. त्यामुळे गैरहजर राहिल्याचे आयुक्तांनी सांगितले.

महापालिकेचा अर्थसंकल्प 18 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. महापालिकेचा सन 2022-23  या आर्थिक वर्षांचा मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 497 कोटी 2 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ऑनलाइन पद्धतीने स्थायी समितीसमोर सादर केला. ढाकणे यांनी अवघ्या दहा मिनिटांत हा अर्थसंकल्प सादर केला होता. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची या बजेटला गैरहजेरी त्यातच ढाकणे यांनी अवघ्या दहा मिनिटांत मांडलेले बजेट यामुळे सर्वच स्थरांतून त्यांच्यावर टीका झाली होती.

त्यापार्श्वभुमीवर आय़ुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या सुटीचे कारण सांगितले. मी घरातील लग्नासाठी सुट्टी घेतली होती. भारत सरकारकडून मी 15 दिवसांपूर्वीच ही सुट्टी मंजूर करून घेतली होती. 20 फेब्रुवारीच्या आतच बजेट सादर करावे लागत असल्याने 18  फेब्रुवारी रोजी बजेट सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या दिवशी नेमके माझ्या घरातील लग्न असल्याने मी बजेटला हजर राहू शकलो नाही. लग्न सोडून मी बजेटला कसा येणार, असे त्यांनी सांगितले.

बजेट शहराला वेगळी ओळख देणारे बजेट आहे. शहर स्वच्छ व सुंदर करणे, दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष योजना राबविणे, रस्ते सफाई, पर्यावरण पुरक धोरण राबविणे, वैद्यकिय सुविधा वाढविणे, जिजाऊ क्लिनिक सुरु करणे, महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर भऱ देणे, महापालिकेचा कारभार जास्तित जास्त ऑनलाईन पद्धतीने करणे ही बेजटची वैशिष्ट्ये असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.