Pimpri News : 50 नगरसेवकांच्या जोरावर पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर करणार : संजय राऊत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवायचा या जिद्दीने शिवसैनिक कामाला लागलेत. आगामी निवडणुकीत 50 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट असून त्याद्वारे शहराचा महापौर शिवसेनेचाच करण्याचा निर्धार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखविला. त्यासाठी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याचे संकेत देत 55 आमदारांचा जसा मुख्यमंत्री झाला. तसा 50 नगरसेवकांचा महापौर होईल, अशी रणनितीही त्यांनी स्पष्ट केली.

आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, ”भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड अशा घोषणा पाच वर्षापूर्वी दिल्या होत्या. पण, या पाच वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. यापेक्षा जास्त वाढताना दिसत आहे. भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड हाच मुद्दा घेऊन शिवसेना महापालिकेची आगामी निवडणूक लढविणार आहे. महापालिका कशी चालवायची, शहर कसे ठेवायचे, लोकांना सुरक्षा कशी द्यायची हे आम्ही दाखवून देणार आहोत.

मुंबई, ठाणे, औरंगाबादमधील लोकांना शिवसेना आधार वाटते. तसेच पिंपरी-चिंचवडमधील लोकांना शिवसेना तुमची आहे आणि तुम्ही शिवसेनेचे आहेत, हे दाखवून दिले जाईल”.

”ताकद ही सुज असते. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यात अर्धे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मूळचे कुठे आहेत ?. आता हे अर्धे उठून राष्ट्रवादीत जातील. इथे ओरिजनल पक्ष शिवसेनाच आहे. बेडूक उड्यातून भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर होणार आहे का ?. इकडून तिकडे जाणारे स्वार्थासाठी पक्ष बदलत असतात. त्यांना महापालिका आणि शहराचे काय पडलेले नाही” असेही ते म्हणाले.

…तरच महापालिका निवडणुकीत आघाडी !

महाराष्ट्रात नक्कीच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. सन्मानाने जागा वाटप झाले तर आम्ही विचार करु. आघाडी होणार नाही असे आम्ही म्हणत नाही. सन्मानाने जागा वाटपबाबत नक्की चर्चा केली जाईल, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.