Pimpri News: सत्ताधारी म्हणतात 100 प्लसचा नारा पूर्ण करु तर विरोधक म्हणतात भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली, सत्तांतर अटळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रभाग रचना अनुकूल असल्याचे सांगितले जाते. सत्ताधारी भाजपने 100 प्लसचा नारा पूर्ण करु असा विश्वास व्यक्त केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने सत्ताधारी भाजपवर तोफ डागत भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली असून महापालिकेत सत्तांतर अटळ आहे असा विश्वास व्यक्त केला.

भाजप 100 प्लसचा नारा पूर्ण करणार – थोरात

भाजपचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले, ”राज्यातील सत्ताधा-यांनी प्रभाग रचनेत काही ठिकाणी हस्तक्षेप केला असल्याचे दिसून येत आहे. परंतु, त्याचा भाजपला काही परिणाम होणार नाही. भाजपची संघटना, दोन आमदार, केंद्र सरकारचे काम, शहरातील विकास कामे, कार्यकर्ते आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद या जोरावर भाजप 100 प्लसचा नारा पूर्ण करणार आहे”.

भाजपच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता कंटाळली – वाघेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”मागील पाच वर्षातील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता कंटाळली आहे. लोक निवडणुकीची वाट बघतच आहेत. आगामी निवडणुकीत 100 टक्के सत्तांतर होणार असून शहराचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल”.

शहरातील लोकांची मानसिकत सत्तांतर करण्याची – कलाटे

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ”प्रभाग रचना एक प्रक्रिया आहे. महाविकास आघाडीला प्रभाग रचना अनुकूलच आहे. शहरातील नागरिकांनी मागील पाच वर्षातील भारतीय जनता पार्टीचा भ्रष्ट कारभार पाहिलेला आहे. त्यांच्या कारभाराला जनता वैतागली आहे. शहरातील लोकांची मानसिकत महापालिकेत बदल करण्याची आहे. त्यामुळे नक्कीच सत्ता बदल होईल”.

प्रभाग रचना मनसेसाठी अनुकूलच – चिखले  
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, प्रभाग रचना मनसेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा मनसेचे उमेदवार निवडून येतील. त्यामुळे प्रलंबित कामे करण्याची चांगली संधी मिळणार आहे.

प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणा-यांना मतदार  जागा दाखवून देतील – कदम

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे. कारखानदारी, पाणी प्रश्न, वायसीएम हॉस्पिटल, महापालिका इमारत काँग्रेसने उभारली. शहरात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. स्वत:चे हित लक्षात घेऊन प्रभाग रचनेत हस्तक्षेप केला आहे. त्यांना शहरातील मतदार त्यांची जागा दाखवून देतील. काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल देतील. येणारा महापौर काँग्रेस पक्षाचाच होईल हे ठामपणे सांगतो”.  तर, प्रभाग रचनेची संपूर्ण माहिती घेत आहोत. विचार करुन प्रभाग रचना केली आहे. पूर्ण अभ्यास करुनच त्यावर जास्त बोलणे योग्य होईल, असे काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.