Pimpri : काँग्रेसच्या राहुल गांधीसमोर शिवसेना बनली शेळी – महापौर उषा उर्फ माई ढोरे

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर शिवसेनेने त्यांचा निषेध करायला हवा होता. परंतु, या मुद्दयावर शिवसेना सत्तेच्या लोभापायी तोंड लपवून गप्प बसली. उलट अमृता फडणवीस यांच्या निषेधासाठी शिवसेनेने आंदोलन केले. शिवसेनेची ही कृती निंदनीय आहे. काँग्रेससमोर शेळी बनलेल्या शिवसेनेने एका महिलेचा निषेध करून आपण वाघ असल्याचा दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही. महिलांचा मान राखणे हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नसल्याचेच महिला शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. आमच्या पायातही जोडे आहेत, हे शिवसेनेने ध्यानात ठेवावे. जशास तसे उत्तर देण्याची आमच्यातही हिंमत असून शिवसेनेने पायातील जोडे हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नये, असे घणाघाती प्रत्युत्तर महापौर माई ढोरे यांनी दिले आहे.

याबाबत महापौर माई ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे वक्तव्य केले. सावरकरांचा असा अपमान आजपर्यंत कोणी केला नाही. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेने या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांचा साधा निषेध सुद्धा केला नाही. शिवसेना सत्तेच्या लोभापायी तोंड लपवून गप्प बसली. काँग्रेसच्या ताटाखालची मांजर झाली. याउलट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही”, असे केलेले वक्तव्य शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे. हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांसाठी वंदनीय आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी केलेले कार्य महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा ठाकरे होणे नाही हेच अमृता फडणवीस यांना महाराष्ट्राला सांगायचे आहे.

परंतु, त्यांचे हे वक्तव्य शिवसेनेला चांगलेच झोंबल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी केलेल्या आंदोलनाचे कोणीही समर्थन करू शकत नाही. एका महिलेबाबत आपण कोणत्या थराला जाऊन वागत आहोत, याचे भान सुद्धा शिवसेनेला राहिले नाही. महिलांनीच महिलांचा मान राखयला हवा. परंतु, महिलांचा मान राखण्याची शिवसेनेची संस्कृती नसल्याचे पिंपरी-चिंचवडमधील महिला शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. सत्तेसाठी काँग्रेससमोर शेळी बनलेल्या शिवसेनेने अशा कृतीमधून आपण वाघ असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा केलेला प्रयत्न आहे. शिवसेनेच्या या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.

आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे. यापुढे अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही सुद्धा आमच्या पायातील जोडे हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे पायातील जोडे हातात घेण्याची वेळ शिवसेनेने आमच्यावर आणू नये. पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना काय आहे, हे संपूर्ण शहराला चांगलेच माहिती आहे. या निषेध आंदोलनामागे शिवसेनेच्या काही जणांचा आपली राजकीय दुकानदारी सुरू करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. परंतु, अशा आंदोलनांतून कोणाला जर आपली राजकीय दुकानदारी सुरू करता येते असे वाटत असेल तर त्यांचा भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.